सांगवी (पुणे): पुर्व वैमनस्यातुन गोळ्या झाडून एकाचा खून केल्याची धक्कादायक घटना नवी सांगवी येथील माहेश्वरी चौकाजवळ बुधवारी (ता. 29) रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी सदर खुनाच्या गुन्ह्याचा छडा लावून तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. दिपक दत्तात्रय कदम (रा. आशिर्वाद बिल्डींग शेजारी, जयमाला नगर लेन नं.02, जुनी सांगवी, पुणे) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर अमन राजेंद्र गिल (वय 18 वर्षे, रा. नवी सांगवी, पुणे), सुजल राजेंद्र गिल (वय 19 रा. नवी सांगवी, पुणे) व सौरभ गोकुळ घुटे (वय- 22, रा. जुनी सांगवी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 20 दिवसांपूर्वी दिपक याने आरोपी सुजल गील व अमन गील यास धमकावलेले होते. याचा राग मनात धरून आरोपींनी दिपक कदमचा कायमचा काटा काढण्यासाठी योजना आखली होती. त्यानुसार आरोपींनी मोटार सायकलवरुन येत दिपक कदम याच्यावर गोळ्या झाडून खून केला. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी पथके तयार केली होती.
सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना आरोपी अमन गिल याचा या खुनामध्ये सहभाग होता, अशी माहिती पोलीसांना एका खबऱ्या मार्फत मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचून आरोपी अमन गिलला अटक केली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता अमन गिल याने सुजल गिल व सौरभ घुटे याच्या मदतीने वरील गुन्हा केल्याची पोलिसांना कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना औंध परिसरातून ताब्यात घेतले. आरोपींनी वरील गुन्ह्याची कबुली दिली आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदिप डोईफोडे, वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त विशाल गायकवाड, सहा. पोलीस आयुक्त सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक तानाजी भोगम, पोलीस उपनिरीक्षक चक्रधर ताकमाते, किरण कणसे, पोलीस अंमलदार प्रकाश शिंदे, विवेक गायकवाड, विजय मोरे, प्रमोद गोडे, विनोद साळवे, राजेंद्र शिरसाट, नितीन काळे, विनायक डोळस, प्रविण पाटील, आकाश खंडागळे, विजय पाटील, निलेश शिंगोटे, राजाराम माने, सुहारा डंगारे यांच्या पथकाने केली आहे.