पुणे : रस्त्यावरून कार वेडीवाकडी चालवत असल्याने तरुणाने हॉर्न वाजवला. याचा राग अनावर झाल्याने तीन अनोळखी व्यक्तींनी तरुणाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत तरुणाचे तीन दात पडून तो गंभीर जखमी झाला. हा प्रकार सोमवारी (ता. १) पहाटे पावणेचारच्या सुमारास खराडी-मुंढवा बायपास रोडवर घडला.
याबाबत अमित बबन जायभाय (वय २९, रा. मगरपट्टा सिटी, हडपसर) याने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन तीन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमित व त्याचा मित्र हे चारचाकी गाडीमधून फेरफटका मारण्यासाठी कोरेगाव, कल्याणीनगर, नगर, लोहगाव रोडने फिनिक्स मॉल येथून खराडी बायपास चौकाकडे जात होते. ते एका दुकानासमोर आले असता, एक चारचाकी चालक रस्त्यावरुन झिगझॅग पद्धतीने कार चालवत होता. तर गाडीतील इतर दोन मुले दाराच्या काचेतून तोंड बाहेर काढून जोरजोरात ओरडत होती. साडेतीन वाजण्याच्या सुमारास हे दृश्य त्याला दिसले. त्यामुळे अमित याने गाडीचा हॉर्न वाजवला. याचा राग आल्याने आरोपींनी त्याला शिवीगाळ केली.
दरम्यान, काही वेळाने अमित आरोपीच्या गाडीच्या पुढे जाऊन एका चहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी थांबला. त्यावेळी आरोपी त्याठिकाणी आले. ‘याला लई माज आलाय, लई हॉर्न वाजवतो, याला मारुन टाका…’ असे म्हणत अमितला बेदम मारहाण केली. तसेच त्याच्या तोंडावर लाथा मारल्याने अमितचे वरचे तीन दात पडले. या मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या अमित जायभाय याने गुरुवारी (ता. ४) चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.