शिरूर : शिरूर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करीत सापळा रचून ३ गावठी पिस्तुलांसह तीन आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळविले आहे.
याबाबत शिरूरचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. ३१ डिसेंबरला पोलीस निरीक्षक जगताप यांना त्यांच्या खबऱ्यामार्फत बातमी मिळाली की, मध्यप्रदेश येथून निखिल एकनाथ चोरे (रा. डोंगरगण, ता. शिरूर, जि. पुणे) हा शिरूर एस.टी. स्टँड येथे येणार असून, त्याच्याजवळ १ गावठी बनावटीचे पिस्तुल व ४ राऊंड आहेत. मिळालेल्या बातमीवर कारवाई करण्यासाठी पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी सापळा पथक तयार करून पंचांना पाचारण केले.
सापळा रचून शिरूर एस. टी. स्टॅंडसमोरील मोकळ्या जागेतून एकाला ताब्यात घेतले. त्याच्याजवळील बॅगमधून २५ हजार ४०० रुपये किंमतीचे १ गावठी बनावटीचे पिस्तुल, ४ जिवंत राऊंड व एक निळ्या रंगाची बॅग असा मुद्देमाल जप्त करून, आरोपीविरूद्ध शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.
अटक आरोपी निखील एकनाथ चोरे याच्याकडे अटकेदरम्यान चौकशी केली असता, आरोपीने पिस्तुल व जिवंत राऊंड उमरटी, मध्यप्रदेश येथून आणल्याचे सांगितले. त्याच्यासोबत विकास बाबाजी चोरे व शुभम सुरेश चोरे यांनी देखील त्यांच्याकडील चारचाकीमधून उमरटी, मध्यप्रदेश येथून २ पिस्तुल व ६ राऊंड आणल्याचे सांगितल्याने आरोपी विकास बाबाजी चोरे व शुभम सुरेश चोरे यांना ताब्यात घेऊन, त्यांच्याकडे चौकशी करून, त्यांना गुन्ह्यात अटक केली. त्यांच्याकडून ५० हजार ८०० रुपये किंमतीचे २ पिस्तूल, ६ जिवंत राऊंड तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली गाडी जप्त करण्यात आली.
या गुन्ह्यात एकूण ७६ हजार २०० रुपये किंमतीचे गावठी बनावटीचे एकूण ३ पिस्तुल व १० जिवंत राऊंड आरोपी निखिल एकनाथ चोरे (वय २०, रा. डोंगरगण, ता. शिरूर, जि.पुणे), विकास बाबाजी चोरे (वय २२, रा. सदर), शुभम सुरेश चोरे (वय २०, रा. सदर) यांच्याकडून हस्तगत करण्यात आले असून, त्यांना गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस एकनाथ पाटील करीत असून, गुन्ह्यातील तीनही आरोपींना न्यायालयाने ४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.