पुणे : राज्यात गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा यांसारख्या घटना तर घडत आहेत. याशिवाय, महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत लक्षणीय वाढ होत असल्याचे म्हटले जात आहे. असे असताना पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. बलात्काराच्या केसमधील आरोपी पुरुषाबरोबर असलेल्या महिलेचे नाव वगळण्यासाठी प्रायव्हेट व्हिडिओ व फोटो व्हायरल करण्याची धमकी पिडितेला देण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी एका 29 वर्षाच्या महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पिंपरीमधील नेहरुनगरमध्ये राहणार्या दोन महिलांवर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या सांगली येथे काम करतात. त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 28 फेब्रुवारी 2023 रोजी फईम ऊर्फ फहिमुद्दीन नईम सय्यद व एका महिलेविरोधात बलात्काराची फिर्याद दिली होती. या महिलेला फईम याने पुण्यात बोलावून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला होता. या गुन्ह्याचे दोषारोपपत्र पोलिसांनी न्यायालयात दाखल केले आहे. या गुन्ह्यात फिर्यादी व फईम याचे प्रायव्हेट व्हिडिओ व फोटो असल्याचा उल्लेख केलेला आहे. फईम याने फिर्यादी यांना फसवणूक करुन ते प्रायव्हेट व्हिडिओ व फोटो काढलेले आहेत. 29 जुलै 2024 रोजी फिर्यादी यांच्या दाजीच्या मोबाईलवर व्हॉटसअॅपवर फिर्यादी व फईम यांचे प्रायव्हेट व्हिडिओ वन टाईम व्ह्यु करुन पाहता येतील असे पाठविले आहे.
फईम याची पत्नी ही मागील दोन महिन्यांपासून फिर्यादीच्या दाजींना फोन करुन धमक्या देत आहे. फिर्यादी यांनी दाखल केलेली केस मागे घेण्यासाठी दबाव टाकत आहे. या गुन्ह्यातील फईमच्या पत्नीची आई आरोपी आहे. तिचे नाव मागे घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकत आहे. जर केस मागे घेतली नाही तर फईम आणि फिर्यादी यांचे प्रायव्हेट व्हिडिओ व फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आहे.
आरोपीच्या पत्नीने एवढ्यावरच न थांबता पीडित महिलेच्या गावातील मज्जिद मधील विश्वस्त लोकांना सांगून या गुन्ह्यातून आपल्या आईचे नाव मागे घेण्यासाठी सांगितले. त्यामुळे त्यांनी देखील मानसिक त्रास देऊन बदनामी केली असल्याचे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे. या प्रकरणी अधिक तपासासाठी सांगली ग्रामीण पोलिसांकडे हस्तांतरीत केला आहे.