पुणे : महाराष्ट्र राज्याची निवडणूक पारदर्शक ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने दोन महत्त्वाचे निर्णय घेतेले आहेत. यामध्ये नागपूरसह मुंबई, ठाणे, पुणे या मोठ्या शहरातील प्रत्येक मतदान केंद्र वेबकास्टिंग द्वारे पहिल्यांदाच निवडणूक आयोगाच्या नजरेखाली असणार आहेत. तसेच राज्यातील प्रत्येक ईव्हीएमच्या बारीक-सारीक हालचालीवरही चक्रीका ॲपच्या माध्यमातून निवडणूक आयोग लक्ष ठेवणार आहे. ईव्हीएम काही फूटही इकडे तिकडे हलवली गेली, तरी ॲपच्या माध्यमातून वरिष्ठ प्रशासनिक अधिकारी आणि निवडणूक आयोगाला या माध्यमातून कळणार आहे. या प्रकारची व्यवस्था यामध्ये करण्यात आली आहे.
राज्यात प्रथमच होणार हा प्रयोग..
नागपूर सह मुंबई, पुणे, ठाणे या राज्यातील मोठ्या महानगरपालिका क्षेत्रातील प्रत्येक मतदान केंद्र वेब कास्टिंगद्वारे प्रशासनाच्या नजरेखाली राहणार आहे. त्यामुळे मतदान केंद्रावर कुठलाही गैरप्रकार झाल्यास तो तात्काळ निवडणूक यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिसांच्या नजरेत येणार आहे. राज्यात असा प्रयोग प्रथमच होणार आहे. मोठ्या महानगरातील प्रत्येक मतदान केंद्रामधील दोन कॅमेराद्वारे आउटपुट (लाईव्ह स्ट्रीमिंग) जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील निवडणूक निर्णय अधिकारी तसेच संबंधित शहरातील पोलीस कंट्रोल रूममध्येही उपलब्ध राहणार आहे. नागपूर जिल्ह्यात तर शहरातील शंभर टक्के आणि ग्रामीण भागातील 50 टक्के, असे 75 टक्के मतदान केंद्र वेबकास्टिंगद्वारे प्रशासनाच्या नजरेखाली ठेवले जाणार आहे.
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी प्रशासन सज्ज..
निवडणूक आयोगाने ईव्हीएमच्या हालचालीवरही बारीक नजर ठेवण्याचे ठरवले आहे. त्यासाठी ईव्हीएमची हाताळणी करणाऱ्या प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मोबाईलमध्ये विशेष चक्रीका ॲप डाऊनलोड करण्यात आले आहे. चक्रीका ॲपच्या माध्यमातून संबंधित अधिकारी व कर्मचारी कुठे जात आहे, ईव्हीएम कुठे नेली जात आहे, त्याची प्रत्येक हालचाल निवडणूक यंत्रणेच्या आणि निवडणूक आयोगाच्या नजरेखाली राहणार आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक राहावी यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.