लोणी काळभोर (पुणे) : तलाठी कार्यालयातील फेरफार नोंद रद्द अथवा नामंजूर झाल्यास त्याबाबत प्रांताधिकारी यांच्या स्तरावर अर्धन्यायीक न्यायाधीकरणात दाद मागण्याची स्पष्ट तरतूद आहे. मात्र, तलाठी, सर्कलने चक्क प्रांताधिकाऱ्यांचे अधिकार वापरुन कारभार केल्याचा गंभीर प्रकार हवेली तालुक्यात उघडकीस आला आहे. हवेलीतील काही तलाठी व सर्कलनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील रद्द केलेल्या नोंदी पुन्हा टाकत प्रोटोकॉलच्या जोरावर मंजूर केलेल्या आहेत. त्यामुळे हवेलीतील प्रांतचे अधिकार तलाठी व सर्कलला कोणी बहाल केले? तसेच रद्द झालेल्या नोंदी पुन्हा टाकून मंजूर करणे, या गंभीर प्रकरणाची पुणे जिल्हाधिकारी सखोलपणे चौकशी करणार का? हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
हवेली तालुक्यातील मौजे कोलवडी व लोणीकाळभोर येथील एक महिन्याच्या कालावधीतील ३६ फेरफार नोंदी, तसेच थेऊर आणि कुंजीरवाडीमधील ३९ फेरफार व मांजरी बुद्रुक मधील १७ फेरफार नोंदी अशा एकूण ९२ फेरफार नोंदी थेऊर सर्कल यांनी रद्द केलेल्या आहेत. मात्र, त्यातील केवळ तीन फेरफार नोंदी पुन्हा धरुन मंजूर केलेल्या आहेत. मग, राहिलेल्या ८९ फेरफारांचे काय ? “निर्णय अधिकारी एकच, फेरफारही एकच, मात्र पहिल्यांदा नोंद नामंजूर, नतंर निर्णय नोंद मंजूर” असा प्रकार सुरू असल्याने सर्कल कार्यालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. ९२ फेरफारांपैकी फक्त तीनच फेरफार पुन्हा दफ्तरी घेऊन मंजूर केले. मात्र, हाच न्याय इतर फेरफारांना का लागू होत नाही. तेही फेरफार नव्याने धरुन मंजूर करावेत, एवढीच माफक अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
मौजे कोलवडी येथील फेरफार क्रमांक १३५४४, १३५४५ व १३५४६ हे फेरफार ३१ ऑगस्ट २०२३ ला थेऊरच्या सर्कल जयश्री कवडे यांनी सदर फेरफारचा अमंल योग्यरित्या न आल्याने सबब नोंद रद्द असा शेरा मारुन रद्द केलेले आहेत. मात्र, तेच फेरफार पुन्हा १३६५५, १३६५६ व १३६५७ या क्रमांकाने घेतलेले आहेत. त्यावर हरकत अर्ज प्राप्त झाल्याने सुनावणी घेऊन संबंधित फेरफार मंजूर केलेले आहेत. रद्द केलेल्या एकूण फेरफारांपैकी केवळ तीनच फेरफारांना एक न्याय व बाकी ८९ फेरफारांना दुसरा न्याय लावल्याने सर्कल कार्यालयातील कारभाराची चर्चा होऊ लागली आहे.
सर्कल यांनी लोणी काळभोर, थेऊर कुंजीरवाडी तसेच मांजरी बुद्रुक या गावातील एकूण ९२ फेरफार रद्द केले आहेत. यामधील बहुतांशी फेरफारांना ‘अमंल योग्यरित्या होत नसल्याने फेरफार नोंद रद्द’ असा शेरा पडला आहे. फेरफार नोंद रद्द झाली की, त्याबाबत सर्वसामान्यांना प्रांताकडे अपील दाखल करावे लागते. मात्र, रद्द फेरफारांपैकी कोलवडीमधील केवळ तीन फेरफार पुन्हा धरुन मंजूर केल्याने त्यांना एक न्याय, व इतर रद्द झालेल्या फेरफारांना दुसरा न्याय, असा मापदंड लावल्याने अधिकाऱ्याच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित होत आहेत.
थेऊर सर्कलचा मनमानी कारभार सुरु आहे. एकदा फेरफार रद्द झाला, तरी परत फेरफार धरल्याने मी तक्रार अर्ज केला होता. माझा अर्ज निकाली काढत फेरफार मंजूर केले आहेत. केवळ तीनच फेरफार पुन्हा घेऊन मंजूर करणे, म्हणजेच यासाठी आर्थिक व्यवहार झालेला आहे. मग इतर रद्द केलेले फेरफारही परत धरुन मंजूर करावेत, अशी आमची मागणी आहे.
-अजित गायकवाड (शेतकरी, कोलवडी, ता. हवेली)
हवेली तालुक्यांमध्ये फेरफार रद्द करुन पुन्हा टाकल्याबाबत अनेकांकडून माहिती मिळाली आहे. यावर तहसीलदार व प्रांत यांनी तपासणी व चौकशी करून कारवाई केली पाहिजे. कोणी तलाठी व सर्कल जाणीवपूर्वक लोकांनी भेटीला यावे, यासाठी असा प्रकार करत असेल आणि रद्द झालेला फेरफार व पुन्हा नव्याने धरलेला फेरफार घेऊन मंजूर केला असेल, तर याबाबत तक्रारीसोबत पुरावे आल्यास निश्चितपणे गंभीरतेने पुढील तपासणी व चौकशी करून अनियमितता आढळल्यास कारवाई करण्याचे आदेश दिले जातील.
-हिम्मत खराडे (रजा राखीव उपजिल्हाधिकारी -पुणे)