दीपक खिलारे
इंदापूर : वालचंदनगर इंडस्ट्रीजमधील कामगारांच्या प्रश्नांबाबत कामगार मंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीत मध्यस्थी करून त्यांचा प्रश्न मार्गी लावला. जेव्हा या कामगारांचे आंदोलन सुरू होते, तेव्हाच त्यांना शब्द दिलेला की, आता प्रश्न मार्गी लावूनच तुमच्याकडे येणार. यामुळे हा शब्द खरा ठरवल्याचा आणि कामगारांच्या चेहऱ्यावरचे समाधान बघून मन भरून आले, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.
वालचंदनगर इंडस्ट्रीजमधील संपामध्ये हर्षवर्धन पाटील यांनी मध्यस्थी करून राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्यासमवेत बैठक लावून कामगारांचा प्रश्न मिटवला. त्याबद्दल कामगारांच्या वतीने हर्षवर्धन पाटील यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. या वेळी उपाटील यांनी सत्काराचा स्वीकार केला व कामगारांसमवेत संवाद साधला.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, जे कामगार वालचंदनगरचे नाव सातासमुद्रापार घेऊन जात आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारच्या समस्यांना सामोरे जावू लागू नये, हीच खूणगाठ मनाशी बांधली होती. त्यांचा प्रश्न मार्गी लागतोय याचे मोठे समाधान आहे. येणाऱ्या काळात त्यांना कोणताही संघर्ष करावा लागणार नाही, यासाठी माझे प्रयत्न सुरूच राहणार आहेत. या कामगारांच्या चेहेऱ्यावर आज जो आनंद आणि समाधान दिसले, ते शब्दांत सांगू शकत नसल्याचे पाटील यांनी सांगितले.
आता कामगारांचा संघर्ष थांबला असून, देशाच्या अनेक मोहिमांमध्ये आपल्या कंपनीचे नाव पुन्हा एकदा यशस्वी करून दाखवण्यासाठी ते सज्ज झाले आहेत, असेही हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.