उरुळी कांचन (पुणे) : प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीची कारवाई सध्या थंडावल्याने पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, उरुळी कांचनसह परिसरात पुन्हा एकदा उघडपणे प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर सुरू झाला आहे. प्रशासनाकडून कारवाई थंडावल्याने विक्रेते आणि ग्राहकही प्लास्टिकचा सर्रासपणे वापर करत आहेत.
राज्य सरकारने प्लास्टिक कॅरीबॅगच्या वापरावर पूर्णपणे बंदी घातल्यानंतर विक्रेते आणि ग्राहक यांच्याकडून या कॅरीबॅग वापरल्या जात असल्याचे दिसून येते. नदीचे प्रदूषण, वातावरण प्रदूषित, नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. कचऱ्यातही प्लास्टिक कॅरिबॅग पोहोचले आहे.
शहरातील अनेक व्यावसायिकांपासून तर मटण, चिकन तसेच भाजीपाला विक्रेते ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्लास्टिक कॅरीबॅगमध्ये हवी असलेली वस्तू देत आहे. त्यामुळे ग्राहकही घरून पिशवी घेऊन बाजारात भाजीपाला घेण्यासाठी येताना दिसत नाहीत.
किरकोळ कारवाईचा धसका घेऊन काही काळ प्लास्टिक कॅरिबॅगचा वापर कमी झाला होता. मात्र, सध्या परिस्थितीत व्यावसायिक बिनधास्त प्लास्टिक पिशव्यांचा वापर करताना दिसून येत आहेत. शहरातून हजारो किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले होते. अनेक दुकानदारांवर किरकोळ कारवाईसुद्धा करण्यात आली होती. आता मात्र कारवाई पूर्णपणे थंडावल्याने प्लास्टिक कॅरिबॅगचा वापर पुन्हा वाढला आहे. त्यामुळे याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
प्लास्टिक वस्तूंच्या खरेदी-विक्रीवर बंदी
प्लास्टिक पिशवी, कापड, थर्माकोल अशा विविध प्लॅस्टिकयुक्त वस्तूचा वापर खरेदी- विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. असे असताना बाजारपेठेत विविध कामांसाठी प्लॅस्टिकचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यातून प्लास्टिक कचरा निर्माण होण्याचे प्रमाण वाढले आहे. दिवसभराच्या कामातून निघणारा प्लास्टिक कचरा रात्रीच्या सुमारास कचराकुंडीवर टाकून देण्यात येतो.
बंदीनंतरही प्लास्टिकच्या कॅरीबॅगचा पुरवठा होतो कसा?
बंदीनंतरही प्लास्टिकच्या कॅरीबॅगचा पुरवठा होतो कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वापरावर बंदी घालण्यात आली. तर उत्पादनावर का नाही, हाही मोठा प्रश्न आहे. बाजारात मागणी होत असल्याने या दुकानापर्यंत कॅरीबॅग पोहोचविण्यासाठी यंत्रणाही कार्यरत झाली असावी. त्यामुळे प्रशासनाने कारवाई मोहीमेत सातत्य ठेवण्याची सध्या नितांत गरज असून प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी होणे काळाची गरज झाली आहे. त्यामुळे प्लास्टिक वापरावर बंदी आणावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
…तर आपोआपच प्लास्टिक पिशव्या कमी येतील
“राज्य सरकारने प्लास्टिक बंदी ही केलेलीच आहे, तसेच शासनाने कडक निर्बंध घालून प्लास्टिकची निर्मिती करणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, औद्योगिक क्षेत्रातील प्लास्टिक तयार करणाऱ्या कंपन्या बंद झाल्या तर आपोआपच प्लास्टिक पिशव्या कमी येतील. तसेच प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्याचे आदेश दिले तर ग्रामपंचायतीकडून ठोस कारवाई केली जाईल.”
– भाऊसाहेब कांचन, सरपंच, उरुळी कांचन, ता. हवेली
प्लास्टिकमुळे बिघडतोय पर्यावरणाचा समतोल
संपूर्ण जनजीवन साखळी प्लास्टिक या घटकामुळे विस्कळीत झाली आहे. पर्यावरण समतोल बिघडला आहे. प्लास्टिक विघटन होण्यास फार मोठा कालावधी लागत असून, कचऱ्यामध्ये मुख्यत: प्लास्टिकचे प्रमाण जास्त आहे. प्लास्टिक जाळल्यानंतर देखील मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण होत असून, यामुळे श्वसनासंबंधी आजार बळावत चालले आहे. देशाचा तसेच येणाऱ्या पिढीचा बचाव करण्यासाठी नागरिकांनी प्लास्टिकचा वापर टाळावा.
– पूजा सणस, भाजप पुणे जिल्हा युवती अघाडी उपाध्यक्षा, उरुळी कांचन, ता. हवेली.