-प्रदिप रासकर
निमगाव भोगी : शिरुर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड (MEPL) कंपनीतील विषारी केमिकलचे पाणी कोणतीही प्रक्रिया न करता सोडून देत असल्यामुळे निमगाव भोगी, आण्णापुर, रामलिंग, कर्डीलवाडी, सरदवाडी, कारेगाव, शिरुर- ग्रामीण, ढोकसांगवी या गावातील ओढे-नाले, विहिरी, बोअरवेलचे पाणी पुर्णपणे दुषित झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड (MEPL) हि कंपनी कायमस्वरुपी बंद करण्यात यावी, या विरोधात पत्र व्यवहार केला होता व संयुक्त बैठक लावण्यात आली होती.
या बैठकीत कंपनी 15 दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. परंतु कंपनीने आदेशाला न जुमानता कंपनी सुरु ठेवण्यात आली आहे. कंपनी कुणाचे ऐकत नसल्यामुळे 9 गावचे लोक एकत्र येऊन 20 सप्टेंबर 2024 रोजी पुणे- नगर महामार्ग अडवत रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड (MEPL) या कंपनीतुन केमिकलचे फेसाळयुक्त काळे पाणी आसपासच्या परिसरातील ओढया-नाल्यांमधुन वाहत येत आहे. ओढ्याला काळ्या व लाल रंगाचे पाणी, तसेच ओढ्याच्या बंधाऱ्यावरुन पडणारे पाणी आपटल्यानंतर पांढऱ्या रंगाच्या फेसाचे ढिग तयार होतात. हे दुषित पाणी जमिनीत मुरत असुन तेच पाणी झिपरुन विहीरीत जात आहे. तसेच नाईलाजास्तव तेच पाणी पिण्यासाठी वापरात येत असल्याने या परीसरातील हजारो नागरीकांना कर्करोग, कॅन्सर, त्वचारोग यांना बळी पडावे लागत आहे. या भागात असंख्य रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली असल्याचे निदर्शनात आले आहे.
रांजणगाव औद्योगिक वसाहतीत असणाऱ्या महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड (MEPL) कंपनीच्या केमिकल युक्त पाण्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची वाट लागलेली आहे. आता या सर्व गावातील नागरिकांनी एकत्र येऊन या कंपनी विरोधात एल्गार पुकारला आहे. येत्या 20 सप्टेंबर 2024 रोजी पुणे-नगर महामार्ग अडवून रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.