लोणी काळभोर: कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाक्याजवळ शुक्रवारी (ता.9) रात्री बारा वाजण्याच्या सुमारास समाधान संभाजी भिटे (वय-31, रा. निर निंबगाव, ता. इंदापूर, जि. पुणे) या एमपीएससी करणाऱ्या तरुणाचा दुचाकी डिव्हायडरला धडकुन गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. समाधान भिटे यांचा मृत्यू झाला मात्र त्यांनी आपले डोळे दान केल्याने दृष्टीहीन गरजूस दृष्टी मिळणार आहे. त्यामुळे समाधान हा ‘जाता जाता दृष्टी देऊन गेला’ असे म्हटले जात आहे. याबाबतची माहिती ‘पुणे प्राईम न्यूज’ ला त्यांच्या कुटुंबीयांनी बोलताना दिली.
नेमकं प्रकरण काय?
समाधान भिटे हा पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता. तर त्याचा मित्र मयूर डोंगरे हा मुंबईमध्ये पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहे. उपजिल्हाधिकारी असलेल्या त्यांच्या मित्राचा विवाह ठरला होता. त्याचा विवाह सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील एका मंगल कार्यालयात होणार आहे. उपजिल्हाधिकारी मित्राचा हळदीचा कार्यक्रम शुक्रवारी (ता.9) पार पडला, तर विवाह शनिवारी (10) होणार आहे.
दरम्यान, समाधान भिटे व मयूर डोंगरे हे दोघेही हळदीच्या कार्यक्रमाला शुक्रवारी आले होते. हळदीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर ते दोघेजण दुचाकीवरून परत निघाले होते. समाधान हा गाडी चालवत होता. तर मयूर डोंगरे हा पाठीमागे बसला होता. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून पुण्याच्या दिशेने जात असताना, अंधारात कवडीपाट टोलनाक्याजवळचा डिव्हायडर न दिसल्याने दुचाकी थेट डिव्हायडरला धडकली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले.
या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के, पोलीस हवालदार बापू वाघमोडे, विजय जाधव, पोलिस अंमलदार तौसिफ सय्यद, राहुल माळगे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन्ही जखमींना तत्काळ लोणी काळभोर (ता. हवेली) येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. दोन्ही जखमींवर उपचार सुरु होते.
समाधान भिटे याच्या छातीला व डोक्याला गंभीर मार लागला होता. समाधानचा शनिवारी (ता. 10) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर पोलीस उपनिरीक्षक मयूर डोंगरे यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती तेथील डॉक्टरांकडून मिळत आहे.
समाधानच्या घरची परिस्थिती हलाखीची
समाधान भिटे हा अतिशय हुशार आणि कष्टाळू विद्यार्थी होता. त्याच्यासोबत त्याचा लहान भाऊ अक्षय हा देखील स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. समाधान याच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या घरची परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. त्याचे कुटुंब अल्पभूधारक आहे. वडील गाई सांभाळून त्या विकण्याचा व्यवसाय करतात, तर आई अंगणवाडी सेविका आहे. समाधान आणि अक्षय हे आर्थिक अडचणीमुळे दोघात एकच जेवणाचा डबा खाऊन अभ्यास होते. एक अत्यंत हुशार आणि कष्टाळू विद्यार्थ्याच्या अपघाती मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबासह मित्रपरिवारावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.