पुणे : शहरातील हडपसर भागातून विकृत घटना समोर आली आहे. येथे एका लिंग पिसाट नराधमाने श्वानावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी नराधमाविरुद्ध काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हलीमुद्दीन शेख (रा. हांडेवाडी, मूळ रा. पश्चिम बंगाल) असे नराधम आरोपीचे नाव आहे. तो सध्या हडपसरमधील हांडेवाडी परिसरात वास्तव्यास आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्या श्वानावर नराधमाने अनैसर्गिक कृत्य केलं ते श्वान पाळीव आहे. मालक कामानिमित्त घराबाहेर गेलेला असताना नराधम आरोपीने कुत्रीवर अनैसर्गिक अत्याचार केला. मालक घरी परतल्यानंतर कुत्रीच्या वागणुकीमध्ये त्यांना अचानक बदल दिसू लागला. त्यामुळे मालकाला शंका आली. त्यानंतर त्यांनी घरामधील सीसीटीव्ही चित्रण तपासले. सीसीटीव्ही तपासले असता हा घृणास्पद प्रकार उघडकीस आला.
दरम्यान, कुत्रीच्या मालकाने या घटनेची माहिती शिवसेनेचे पदाधिकारी राजेश पळसकर यांच्यासह तेथील स्थानिक नागरिकांना दिली. त्यानंतर पळसकर आणि नागरिकांनी तातडीने पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी त्यानंतर कारवाई करत आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली. पोलीस अधिक तपास करत आहेत.