पुणे: कोथरुड येथील निंबाळकर चौकात शनिवारी (दि. १०) रात्री भरधाव वेगातील थार जीप चालकाने रस्त्याच्याकडेला उभ्या करण्यात आलेल्या पाच दुचाकी उडवल्या. दरम्यान, त्या ठिकाणी कोणी नागरिक नसल्याने मोठी दुर्घटना टळली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
याप्रकरणी अलंकार पोलिसांनी ऋषी पुजारी (वय. ३१, रा. कोथरुड) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून, त्याला ताब्यात घेतले आहे. पुजारी हा हॉटेल व्यवसायिक आहे. त्याने मद्यप्राशन केले होते किंवा कसे हे पडताळून पाहण्यासाठी ससून रुग्णालयात त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. यासंदर्भात विश्वेष विजय देशपांडे (रा. पौड) यांनी फिर्याद नोंदवली आहे. हा प्रकार शनिवारी रात्री साडे आठ वाजताच्या सुमारास कोथरुडमधील निंबाळकर चौक येथील युफोरिया बाय खेळीया या दुकानासमोर घडला आहे.
देशपांडे यांचे निंबाळकर चौकात खेळणी विक्रीचे दुकान आहे. त्यांच्या दुकानासमोर काही नागरिकांनी वाहने उभी केली होती. तेथे रात्री साडेआठच्या सुमारास मोठा आवाज झाल्याने ते दुकानाबाहेर पळत आले. तेव्हा, एका काळ्या रंगाच्या थार जीपची (एम. एच. १२ यू. एन. १३०६) दुचाकांनी धडक दिली होती. त्यामध्ये पाच दुचाकींचे मोठे नुकसान झाले. त्यांनी गाडीजवळ जाऊन पुजारी याला गाडी बाजूला घेण्यास सांगितले. मात्र, तो तेथून पसार झाला. हा प्रकार घडल्यानंतर देशपांडे यांनी अलंकार पोलिस ठाण्यात तक्रार दिली.