पुणे: पुणे जिल्ह्यातील दौंड आणि शिरूरला सध्या दुहेरी संकटाचा सामना करत आहेत. बिबट्यानंतर या भागात गव्यांचे दर्शन झाल्याने आणखी एक संकट उभे राहिले आहे. या दुहेरी संकटामुळे परिसरातील नागरिक दहशतीत असून स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र, गवे आले कुठून याबाबत परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे. या भागात अनेक वेळेस बिबट्याने हल्ले केले आहेत. गेल्या काही वर्षांपासून या भागात बिबट्या आढळून येत आहेत आणि मानवांवर आणि पशुंवर बिबट्याने केलेले हल्ले ही एक नियमित घटना बनली आहे. पारगाव आणि गणेगाव दुमाला या गावांमध्ये गवे दिसल्याचे अनेकांनी सांगितले आहे. परिसरात गवे मुक्तपणे फिरताना दिसू लागले आहेत, ज्यामुळे रहिवाशांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. वन विभागाने या समस्येवर तातडीने उपाययोजना करणे आणि पिके आणि पशुधनाचे आणखी नुकसान होऊ नये यासाठी तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे.
जंगलांमध्ये पाणी आणि अन्नाच्या कमतरतेमुळे हे जंगली प्राणी लोकवस्तीत येत असल्याची शक्यता आहे. मानव आणि प्राणी दोघांचीही सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अधिकाऱ्यांनी सक्रिय उपाययोजना केल्या पाहिजेत, असे नागरिकांनी सांगितले आहे.