सागर जगदाळे
भिगवण : पुणे जिल्ह्यातील अग्रगण्य शिक्षणसंस्था म्हणून दत्तकला शिक्षण संस्था अल्पावधीतच नावारूपाला आली आहे. आज संस्थेचा सतरावा वर्धापनदिन शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, उपाध्यक्ष राणा सूर्यवंशी, सचिव माया झोळ यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला.
स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर शिक्षकांनी नवीन गोष्टी अंगिकारून मुलांना त्या पद्धतीने शिक्षण दिले तरच संस्थेचे नाव होणार आहे व स्पर्धेत संस्था टिकून राहणार आहे. आज आपल्या संस्थेच्या विविध विभागांमध्ये जवळपास पाच हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ही पोच आपल्या संस्थेला कमी कालावधीत मिळाली आहे, प्रा. झोळ यांनी सांगितले.
संस्थेमध्ये मुलांसाठी संगीत, नृत्य, जादूचे प्रयोग इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. विशाल बाबर स्कूल विभागाच्या संचालक नंदा ताटे, ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या सिंधू यादव व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.