पुणे : पुण्यातील फुटपाथवर वेगवेगळ्या वस्तूंचे स्टॉल काढून घेत असताना दोन महिलांनी महिला पोलिसांच्या कॉलरला पकडून गणवेशाच्या शर्टची दोन बटणे तोडली. तर तिसर्या महिलेने आंदेकरच्या ऑफीसला नेऊन तुला दाखवते मी कोण आहे ते, अशी धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी महिला पोलीस शिपाई अश्विनी बनसोडे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यावरून पोलिसांनी उमा राजेंद्र रणदिवे (वय-३४), रोशनी राजेंद्र रणदिवे (वय-१९, रा. धनकवडी) या मायलेकीसह तीन महिलांवर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार बेलबाग चौकातील मुळचंद दुकानाच्या कॉर्नरलगत सोमवारी सांयकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदार सपकाळ, पोलीस हवालदार सय्यद यांच्यासह व्हीव्हीआयपी मुव्हमेंटमध्ये अडथळा होऊ नये, म्हणून बेलबाग चौक परिसरातील आणि शिवाजी रोडवरील हॉकर्स तसेच फुटपाथवरील वेगवेगळ्या वस्तुंचे स्टॉल काढून घेत होत्या. त्यावेळी फुटपाथवर बांगड्या विकणार्या या मुलीने त्यांना शिवीगाळ केली.
तसेच तू पोलीस आहेस, म्हणून दादागिरी करत आहेस का, असे मोठमोठ्याने आरडाओरडा केला. त्या ठिकाणी अडथळा होऊ नये, म्हणून त्यांना पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना उमा रणदिवे या महिलेने फिर्यादी यांना धक्काबुक्की करत सरकारी कामात अडथळा आणला. तसेच फिर्यादी यांच्या गणवेशाची कॉलर पकडून खाली खेचून शर्टाची दोन बटणे तोडली.
फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र तोडून नुकसान केले. त्यांच्याबरोबरच्या महिलेने “आंदेकरच्या ऑफीसला नेऊन तुला दाखवते मी कोण आहे ते,” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक वाघमारे करत आहेत.