पुणे : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सूत्रे आल्यानंतर अजित पवार विरूद्ध शरद पवार एकप्रकारे राजकीय लढा सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. असे असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातही खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा नणंद-भावजयचा सामना पाहायला मिळणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवार घराण्याचा पारंपारिक मतदारसंघ समजला जातो. त्यामुळे ही जागा जिंकण्यासाठी दोन्ही गटांकडून प्रयत्न केले जाणार आहे. त्या दृष्टीने पावलेही उचलण्यात येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर खासदार सुळे यांनी मतदारसंघात लक्ष केंद्रित करत भेटीगाठी सुरू केल्या. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा देखील प्रचार केला जात आहे. या मतदारसंघामध्ये सुनेत्रा पवार यांनी केलेल्या विकासकामांची माहिती देणारा चित्ररथ फिरत आहे. असे जरी असले तरी सुप्रिया सुळे यांचा आतापर्यंतचा अनुभव आणि त्यांनी केलेली कामे बघता सामना एकतर्फी होण्याची चर्चा मतदारांमध्ये आहे.
जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी थेट वरिष्ठांना बारामती लोकसभा मतदारसंघाचा अहवाल दिला. त्यात बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उमेदवार असतील तरच खासदार सुप्रिया सुळे यांचा पराभव अटळ असल्याचे म्हटले होते. त्यामुळे भाजपकडून अजित पवारांवर दबावतंत्र वापरण्यात येत होते. अखेर गेल्या काही दिवसांपासून बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांनी गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली. तसे बॅनरही काही ठिकाणी झळकले आहेत.
सुनेत्रा पवार थेट निवडणुकीच्या रिंगणात; तयारीही सुरु
राष्ट्रवादी काँग्रेसकडून बारामती लोकसभा मतदारसंघासाठी अद्याप कोणालाही उमेदवारी जाहीर केली नाही. असे असले तरी सुनेत्रा पवार थेट रिंगणात उतरल्या आहेत. त्यांनीही हळदी-कुंकूसारखे कार्यक्रम घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी केलेल्या कामांची माहिती पोहोचवण्यासाठी संपूर्ण मतदारसंघात चित्ररथ फिरवले जात आहेत. तसेच त्यांनी दौंडमध्ये जाऊन आमदार राहुल कुल कुटुंबीयांची देखील त्यांनी भेट घेतली आहे.
लोकशाहीत कुणीही विरोधात उभे राहू शकतं
बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कोणीही उभे राहू शकते. लोकशाहीमध्ये निवडणुकीला उभे राहण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. तो अधिकार कोणी गाजवत असेल तर त्यासंबंधी तक्रार करण्याचे काहीच कारण नाही, असे शरद पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत अजित पवारांनी केलेल्या आरोपांचे चोख प्रत्युत्तर दिले.