नसरापूर : नसरापूर चेलाडी येथे महामार्गालगत आरोग्य केंद्राच्या बांधकामावरील ठेकेदाराच्या सुपरवायझरने बांधकाम साइटवरील पत्र्याच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना शनिवारी (दि. ३०) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.
निवृत्ती दादाभाऊ पळसे (वय-38, रा. मूळगाव बाजी उमरद वाखरी, जि. जालना; सध्या रा. बांधकाम साइटवर, नसरापूर) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत डंपरचालक करण नानासो खरात (रा. कांब्रे, ता. भोर) याने राजगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास खडी वाहतूक करणाऱ्या डंपरचा चालक खरात हा डंपर वाहतुकीच्या चलनाची पावती घेण्यासाठी आरोग्य केंद्राच्या बांधकाम साइटवर सुपरवायझर निवृत्त पळसे यांना भेटण्यासाठी आला होता. त्या वेळी ते राहत असलेल्या पत्र्याच्या घराचा दरवाजा आतून लावला होता. करण याने आवाज दिला. मात्र, काहीच प्रतिसाद न मिळाल्याने त्याने मोबाईल बॅटरीच्या उजेडात पत्र्याच्या खोलीत फटीतून पाहिले असता निवृत्ती पळसे यांनी वायरच्या साहाय्याने खोलीच्या छताला गळफास घेतल्याचे आढळले.
याबाबत त्याने तातडीने डंपरमालक व बांधकाम ठेकेदार यांना फोन करून माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजा उघडून पळसे यांचा मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी ताब्यात घेतला. पुढील तपास पोलिस हवालदार अजित माने करत आहेत.