– विजय लोखंडे
वाघोली (पुणे) : वाघोली-केसनंद-कोलवडी-थेऊर फाटा मार्गे हडपसर या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या मार्गावर पीएमपीएमएल खात्याची बससेवा नियमित अर्ध्या तासाला सुरू करावी, अशी मागणी कोलवडी-साष्टे ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या वतीने उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार व पीएमपीएमएल प्रशासन यांच्याकडे लोकनियुक्त सरपंच विनायक गायकवाड यांनी केली आहे.
केसनंद, कोलवडी, थेऊर गावामध्ये बाहेरून येणा-यासाठी गैरसोय होत असून या गावांमध्ये वाढत्या लोकसंख्यामुळे गावातील शालेय महाविद्यालयीन व कॉलेजचे विद्यार्थी, मोठ्या प्रमाणात शेतकरी, व्यापारी वर्ग, कंपनी नोकर वर्ग, कर्मचाऱ्याच्या व प्रवाशांच्या दृष्टीने येण्या-जाण्यासाठी वाघोली, केसनंद, कोलवडी, थेऊर फाटा मार्गे हडपसर पीएमपीएमएल खात्याची बस सेवा सकाळी 7 ते 12 व दुपारी 4 ते रात्री 9 पर्यंत अर्धा तासाला नियमीत सुरु करण्यात यावी, अशी मागणी कोलवडी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, गावचे लोकप्रतिनिधी व पूर्व हवेली परिसरातील ग्रामस्थ करीत आहे. शिरूर- हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी स्वतः पत्राद्वारे लेखी निवेदन पीएमपीएमएल खात्याचे स्वारगेटचे व्यवस्थापकीय संचालक यांना मागील महिन्यात 19 जून रोजी दिले आहे. तरी देखील अद्याप या मार्गावर नियमित अर्ध्या तासाला बससेवा सुरू झाली नाही.
कोलवडी, केसनंद, थेऊर, लोणी काळभोर या पूर्व हवेली गावांची लोकसंख्या वाढली आहे. तितकेच दळणवळण वाढले आहे. येथे पुणे शहरात जाणाऱ्या विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार, व्यापारी, प्रवासी यांची संख्या वाढली असल्याने दर अर्ध्या तासाला या मार्गावर बससेवा सुरू होणे गरजेचे आहे.
– रमेश मदने, उपसरपंच -ग्रामपंचायत कोलवडी-साष्ठेयाबाबत सर्व माहिती घेऊन वाघोली-केसनंद-कोलवडी-थेऊर फाटा मार्गे हडपसर बससेवा सुरू करण्यासाठी आमचा प्रयत्न राहील. पुढे कार्यवाही सुरू करू.
– दिपा मुंडे, व्यवस्थापकीय संचालक स्वारगेट, पीएमपीएमएल