पुणे : सध्या सगळीकडे लोकसभेच्या निवडणुकीसाठीच्या उमेदवारीच्या चर्चा रंगताना दिसत आहे. त्यातच पुणे लोकसभेसाठी इच्छूकांची रांग लागली आहे. त्यातच पुण्यात लागलेल्या एका बॅनरमुळे भाजपमधील अंतर्गत धुसफूस अखेर चव्हाट्यावर आली आहे. माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यातच भाजपकडून मोहोळांविरोधात महापालिकेत बॅनरबाजी करण्यात आली आहे. स्टॅंडिंग दिली, महापौर केलं, सरचिटणीसपद पण दिलं, आता तुला पाडणार… अशा आशयाचे बॅनर्स लक्ष वेधून घेत आहेत.
दरम्यान, बॅनर दिसल्यावर महापालिकेकडून हा बॅनर लगेच हटवण्यात आला आहे. मात्र, या बॅनरची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. भाजपने जाहीर केलेल्या संभाव्य यादीत मुरलीधर मोहोळांचे नाव दिसत असल्यामुळे नाराजांनी ही बॅनरबाजी केल्याची माहिती मिळत आहे. भाजपचे बाकी इच्छूक उमेदवारांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केल्याचे या बॅनरमधून दिसत आहे.
बॅनरमध्ये आहे काय?
स्टॅंडिंग दिली , महापौर केलं , सरचिटणीस पण दिलं… आता खासदारकी पण ? आता बास झालं तुला नक्की पडणार…
– कष्टाळू भाजप कार्यकर्ते
पुणे भाजपमध्ये अंतर्गत धूसफूस सुरु आहे. अनेक कार्यक्रमांत ही धूसफूस दिसून आली होती. त्यातच भाजप नेत्यांमध्येच इव्हेंट वॉरदेखील बघायला मिळाले होते. मात्र, हा वाद यापूर्वी उघडपणे समोर आला नव्हता. आता मात्र थेट महापालिकेत बॅनरबाजी करत हा वाद भाजपच्याच कार्यकर्त्यांनी समोर आणला आहे. या बॅनरची माहिती मिळताच महापालिकेकडून हे बॅनर हटवण्यात आले आहे.
मुरलीधर मोहोळ यांची पार्श्वभूमी काय?
– पुणे महापालिकेचा सभासद म्हणून चार वेळा विजयी.
– २०१९-२२ मध्ये पुणे महापालिकेचे महापौर.
– उपाध्यक्ष, अखिल भारतीय महापौर परिषद
– पुणे महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्ष २०१७-१८
– संचालक, पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (पीएससीडीसीएल) २०१७-१८
– संचालक, पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) २०१७-१८
– सभासद, पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) २०१७-१८
– २००९ खडकवासला (पुणे) मतदारसंघातून निवडणुकीसाठी उमेदवार.