पुणे : पुण्यात शेतावर कामाला आला नाही म्हणून एका कातकरी समाजाच्या आदीवासी मजुराचा अत्यंत निर्घृणपणे खून केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. माणुसकीला लाजवणारी ही घटना बुधवार (दि. ३) जुलै रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास खडकवासला धरणाच्या मागे असलेल्या मांडवी बुद्रुक गावात घडली आहे. भरत लक्ष्मण वाल्हेकर (वय-५५, सध्या रा. मांडवी बुद्रुक, ता. हवेली, मूळ रा. रोहा, जि. रायगड) असे खून झालेल्या मजुराचे नाव आहे.
या प्रकरणी हवेली पोलिसांनी संजय हिंदुराव पायगुडे (वय-५०, रा. मांडवी बुद्रुक) आणि सचिन नथु पायगुडे (वय-४५, रा. मांडवी बुद्रुक) या दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून संजय पायगुडे याला अटक करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, भरत वाल्हेकर हा मजूर शेतावर कामाला आला नाही म्हणून आरोपींची आधी त्याच्यावर कोयत्याने वार करीत त्याला गंभीर जखमी केले. त्यानंतर त्याची पत्नी त्याला रुग्णालयात घेऊन जात असताना या दोघांनाही कारखाली चिरडून त्यांच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, या दोघांनाही स्थानिकांनी रुग्णालयात दाखल केले. मात्र, या मजुराचा मृत्यू झाला. तर, त्याच्या पत्नीवर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी हवेली पोलिसांनी संजय पायगुडे आणि सचिन पायगुडे या दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. यातील संजय पायगुडे याला अटक करून शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने संजय पायगुडेला ८ जुलैपर्यन्त पोलीस कोठडी सुनावली आहे. तर, सचिन पायगुडे हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.