दौंड : दौंड तालुक्यातील खोर-भांडगाव परिसरात शेतजमिनीतून माती उपसा करून हायवा वाहनाच्या साह्याने खुलेआम भरधाव वेगाने बेकायदा वाहतूक सुरू आहे. महसूल विभागाकडून कसलीही कारवाई केली जात नसल्याने नागरिकांना प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत आहे.
काही दिवसांपासून भांडगाव खोर रस्त्याच्या पश्चिमेस खोर परिसरात शेत जमिनीतून जेसीबी व पोकलेन मशीनच्या साह्याने माती उपसा केला जात आहे. मोठ्या हायवा, जड वाहनांमधून ही माती वाहतूक बेकायदारित्या खुलेआम केली जात आहे. मातीने भरलेले हे हायवा डंपर वाहने खोर भांडगाव या मुख्य रस्त्यावरून भरधाव वेगाने तसेच यवत , चौफुला दिशेने पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून वाहतूक करत आहेत.
भांडगाव गावातून जाणाऱ्या वर्दळीच्या रस्त्यावरून भरधाव वेगाने ही वाहतूक सुरू असते. गावातूनच रस्ता जात असल्याने लहान मुले, अनेक नागरिक रस्त्याजवळच उभे असतात. अशा परिस्थितीत ही माती वाहतूक करणारी वाहने भरधाव वेगाने ये-जा करत असून, रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारांना देखील आपली वाहने रस्त्याच्या खाली घ्यावी लागतात. या जड वाहनांमुळे शेतकऱ्यांचे दळणवळण करणाऱ्या शेतजमिनीतील अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडले आहेत.
खोर परिसरात मोठ्या प्रमाणात माती उपसा व वाहतूक चालू असून, महसूल प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. याबाबत खोरचे तलाठी पाटील यांच्याशी अनेकवेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. तरी खोर परिसरात माती उपसा जोमाने सुरु असून, तहसीलदार अरुण शेलार यांनी या प्रकरणाकडे लक्ष घालून चालू असलेला माती उपसा बंद करून संबंधितांवर कारवाई करावी तर पोलीस प्रशासनाने अशा भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.