उरुळी कांचन (पुणे) : पूर्व हवेलीतील सोरतापवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी स्नेहल विठ्ठल चौधरी यांची ९ विरुद्ध ६ मतांनी निवड झाली आहे. पूनम नवनाथ आढाव यांना ६ मते मिळाली. सत्ताधारी गटाची दोन मते फुटल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे गेल्या ७० वर्षांनंतर सोरतापवाडी ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी गटाला मिळालेली सत्ता गमवावी लागली आहे.
संध्या अमित चौधरी यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्याने बुधवारी (ता. २४) ही निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत स्नेहल चौधरी व पूनम नवनाथ आढाव यांचा सरपंचपदासाठी प्रत्येकी एक-एक अर्ज आला होता. उपस्थित १५ सदस्यांमध्ये गुप्त मतदान घेण्यात आले. यात स्नेहल चौधरी यांना ९ तर पूनम नवनाथ आढाव यांना ६ मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उरुळी कांचनच्या मंडलाधिकारी नूरजहाँ सय्यद यांनी तर सहायक म्हणून प्रभारी ग्रामविकास अधिकारी संतोष गायकवाड, तलाठी निवृत्ती गवारी यांनी कामकाज पाहिले.
या वेळी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा पूनम चौधरी, युवा नेते सागर नाना चौधरी, बाळासाहेब चौधरी, मनोज चौधरी, माजी सरपंच संध्या चौधरी, विलास चौधरी, सनी चौधरी, शशिकांत भालेराव, विजय चौधरी, शंकर कड, निलेश खटाटे, सुप्रिया चौधरी, अश्विनी शेलार, सोनाली लोंढे आदी ग्रामस्थ, ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते. या वेळी उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सोरतापवाडी ग्रामपंचायतीच्या १५ जागा असून, सुदर्शन चौधरी व सागर चौधरी यांच्या नेतृत्वाखाली भाई के. डी. चौधरी पुरोगामी ग्रामविकास पॅनेल तर राष्ट्रवादी सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र चौधरी, माजी उपसरपंच राजेंद्र तानाजी चौधरी व राष्ट्रवादीचे युवा नेते अजिंक्य रामदास चौधरी यांच्या नेतृत्वाखालील सोरतापेश्वर ग्रामविकास पॅनेल व शिवशंभो ग्रामविकास आघाडी यांच्यात सरळ लढत झाली होती. तर तीन जागा बिनविरोध झाल्याने, निवडणूक झालेल्या ११ जागांपैकी भाई के. डी. चौधरी पुरोगामी पॅनेलला ४ जागा मिळाल्या होत्या. तर सोरतापेश्वर ग्रामविकास पॅनेल व शिवशंभो ग्रामविकास आघाडीने ७ जागांवर विजय मिळवता आला होता.
सोरतापवाडी ग्रामपंचायतीत तब्बल ६ दशकानंतर सत्तांतर घडले होते. भारतीय जनता पक्षाचे नेते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी व युवा नेते सागर चौधरी यांच्या सत्तेला सुरुंग लावण्यात ६० वर्षांनंतर विरोधकांना यश आले होते.
राष्ट्रवादी सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र चौधरी, माजी उपसरपंच राजेंद्र तानाजी चौधरी व राष्ट्रवादीचे युवा नेते अजिंक्य रामदास चौधरी यांच्या नेतृत्वाखालील सोरतापेश्वर ग्रामविकास पॅनेल व शिवशंभो ग्रामविकास आघाडीने पंधरापैकी ८ जागांवर विजय मिळवत ग्रामपंचायतीच्या सत्तेवर कब्जा मिळविला होता. तर माजी सरपंच सुदर्शन चौधरी व युवा नेते सागर चौधरी यांच्या नेतृत्वाखालील भाई के. डी. चौधरी पुरोगामी ग्रामविकास पॅनेलला ७ जागांवर समाधान मानावे लागले होते.