लोणी काळभोर, ता. १२: पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर हडपसर ते कवडीपाट टोलनाका दरम्यानच्या अतिक्रमणांवर पुणे महानगरपालिका (PMC) आणि पीएमआरडीएने संयुक्त कारवाई केली. लाखोंच्या किंमतीची अतिक्रमणे जेसीबी आणि क्रेनच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली. त्यामुळे अतिक्रमणधारकांमध्ये नाराजी असली, तरी फेरीवाले आणि पथारीवाल्यांमध्ये मोठ्या आनंदाचे वातावरण आहे. कारण अतिक्रमण निघाल्यानंतर पुन्हा नव्या जोमाने फेरीवाल्यांनी जागा ताब्यात घेतली असून, नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
रस्ता मोकळा, पण वाहतूक कोंडी जैसे थे!:
अतिक्रमण हटविल्यानंतर महामार्ग वाहतुकीसाठी मोकळा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात, सेवा रस्ता आणि पादचारी मार्गांवर हातगाड्या, टपऱ्या आणि भाजीबाजारांनी पुन्हा कब्जा केला आहे. त्यामुळे फेरीवाल्यांना मोठ्या प्रमाणात मोकळी जागा मिळाली, पण वाहतूक कोंडीचा प्रश्न जैसे थे राहिला!
महामार्ग पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यात:
पीएमआरडीएने ३ मार्चपासून अतिक्रमणविरोधी मोहिम राबविली. हडपसर येथील वैभव सिनेमापासून सुरुवात झाली आणि लक्ष्मी कॉलनी, मांजरी, शेवाळवाडी, फुरसुंगी फाटा, कवडीपाट टोलनाका येथे हॉटेल्स, टपऱ्या आणि दुकाने हटविण्यात आली. पण, कारवाई होताच काही तासांतच अतिक्रमण धारकांनी पुन्हा जागा ताब्यात घेतल्या.
शेवाळवाडीत महामार्गाच्या दोन्ही बाजूंना अनधिकृत चिकन-मटण दुकानांचा सुळसुळाट होता. महापालिकेने ही दुकाने हटविली असली, तरी काही दिवसांतच नव्या स्वरूपात ती पुन्हा उभी राहिली आहेत. कवडीपाट, मांजरी उपबाजार आणि शेवाळवाडी परिसरात भाजीविक्रेते पुन्हा ठाण मांडून बसले आहेत.
कारवाई फसवी – अतिक्रमण हटलेच नाही!
या कारवाईमुळे अतिक्रमण करणाऱ्यांच्या मनात कोणताही धाक राहिलेला नाही. अतिक्रमण निर्मुलन पथक येते, हटवते, आणि निघून जाते. काही तासांतच परिस्थिती जैसे थे होते. त्यामुळे ही कारवाई केवळ दिखाऊ असून प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
वाहतूक कोंडी कायम – जबाबदार कोण?
हडपसर ते कवडीपाट दरम्यान महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. भाजी खरेदीसाठी लोक महामार्गावरच गाड्या लावतात, त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावतो. कारवाई होत असूनही हे अतिक्रमण पुन्हा उभे राहत आहे, त्यामुळे ही दुकाने कोणाच्या आशीर्वादाने चालू आहेत, हा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
शासन केव्हा जागे होणार?
अतिक्रमण हटविण्याच्या नावाखाली महापालिका आणि पीएमआरडीए केवळ कागदी घोडे नाचवत आहे. ठोस उपाययोजना न केल्यास महामार्गावर वाहतूक कोंडी कायम राहणार आहे. नागरिक आता प्रशासनाच्या कृतीकडे पाहत आहेत – ही फसवी कारवाई थांबवून खऱ्या अर्थाने महामार्ग मोकळा होणार का?