लोणी काळभोर, (पुणे) : पुणे – सोलापूर महामार्गावरील लोणी स्टेशन चौकातील सिग्नलचे काम करणाऱ्या कामगाराचे पैसे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या (NHAI)अधिकाऱ्यांनी दिले नसल्याने वाहतुकीचे सिग्नल मागील एक महिन्यांपेक्षा जास्त दिवस बंद आहेत. अशी खात्रीदायक माहिती काम करणाऱ्या एका कामगाराने दिली आहे. लोणी काळभोर वाहतूक पोलीस व महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी दखल घेऊन येथील समस्येचा निपटारा करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असल्याने तसेच बाजूलाच मोठे रुग्णालय असल्याने रस्त्यावर 24 तास गर्दी असते. महामार्गाच्या बाजूलाच शाळा, व त्याच्या पुढच्या चौकात मोठे नामांकित महाविद्यालय असल्याने विद्यार्थ्यांची देखील मोठी वर्दळ असते. सिग्नल बंद असल्याने नागरिकांना महामार्ग ओलांडताना अडचणी निर्माण होत असून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. चौकाच्या ठिकाणी वाहतूक पोलिस वाहतुकीचे नियोजन करत आहेत.
पुणे -सोलापूर महामार्गावरील वाहतूक नियंत्रित करण्याच्या उद्देशाने चौकात बसवलेली सिग्नल यंत्रणा कोलमडली आहे. महामार्गावरील लोणी स्टेशन, थेऊर फाटा, उरुळी कांचन येथील तळवाडी चौकातील सर्वच सिग्नल बंद आहेत. त्यामुळे वाहतूक विस्कळीत होत आहे. सध्या नवरात्रीचे दिवस असून दसरा व दिवाळीच्या सुट्ट्या नागरिकांना लागणार आहेत. त्यामुळे पुण्यातून सोलापूर, लातूर, धाराशिवसह कर्नाटक राज्यात कामगार व नागरिक मोठ्या प्रमाणात स्थलांतर करतात. त्यामुळे वाहनांची वर्दळ वाढणार आहे. अशातच सिग्नल बंद असल्याने वाहतूक अनियंत्रित झाली आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, पुणे-सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील तळवाडी चौकात वाहतूक नियंत्रक दिवे अर्थात ट्रॅफिक सिग्नल दोन वर्षांपूर्वी बसवण्यात आले आहेत. हे सिग्नल सुस्थितीत असतानाही दिवे बसवल्यावर आजतागायत अजूनही सुरु करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे हे ट्रॅफिक सिग्नल फक्त शोसाठी बसवण्यात आले आहेत का? असा सवाल उरुळी कांचन परिसरातील नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.