उरुळी कांचन (पुणे) : पूर्व हवेलीतील अष्टापूर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील गावठाण माळवाडी परिसरामध्ये बिबट्या आढळून आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
एका ग्रामस्थाला ऊसाच्या शेतात बिबट्याचे दर्शन झाल्याने भितीचे वातावरण पसरले आहे. मागील दोन दिवसापासून संध्याकाळच्या वेळेस बिबट्या नागरिकांच्या निदर्शनास दिसून येत आहे. या घटनेची माहिती मिळताच अष्टापुर गावचे माजी उपसरपंच भाजपा सोशल मीडियाचे तालुकाध्यक्ष सोमनाथ कोतवाल यांनी फोनद्वारे यांनी वनरक्षक भीकणे यांना माहिती दिली. त्यानुसार, वनक्षेत्रपाल कर्मचारी सपकाळे, भीकणे, वनसेवक जाधव यांनी ज्या ठिकाणी बिबट्याचा वावर होता. त्या ठिकाणी पायाच्या ठशाची पाहणी केली. त्यानुसार बिबट्याचे वास्तव्य परिसरात असल्याचे निदर्शनास आले.
अष्टापुर गावच्या सरपंच अश्विनी कोतवाल, माजी सरपंच कविता जगताप, उपसरपंच गणेश कोतवाल माजी उपसरपंच सोमनाथ कोतवाल, शामराव कोतवाल, दत्तात्रय कटके, आबासाहेब कोतवाल, उद्योगपती राजेश कोतवाल, प्रगतशील बागायतदार पोपट कोतवाल लक्ष्मण कटके व दिनकर निकाळजे समस्त ग्रामस्थ अष्टापुर यांनी अष्टापुर परिसरामध्ये वन अधिकाऱ्यांच्याकडे पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.