पुणे : पुण्यामधुन एक धक्कादायक प्रकार घडला आहे. तुळापूर येथील त्रिवेणी संगमावर अंघोळ केल्यानंतर रुममध्ये कपडे बदलत असताना एका महिलेचे मोबाईलवर शुटिंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तेथील पंडितच हे कृत्य करत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही घटना २७ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
या प्रकरणी एका २९ वर्षीय महिलेने लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून, लोणीकंद पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अमोल विजय टोणगावकर (वय-३६, रा. बकोरी फाटा, वाघोली) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी, त्यांचे पती व दीर हे टोणगावकर पंडित यांच्या सांगण्यावरुन तुळापूर येथील त्रिवेणी संगमावर गेले होते. त्यावेळी पुजा झाल्यानंतर फिर्यादी आणि त्यांच्या पतीला नदीत अंघोळ करायला सांगितले. आंघोळ करुन आल्यानंतर फिर्यादीला पंडिताने पुजेच्या रुममध्ये कपडे बदलण्यास सांगितले.
त्या रुममध्ये कपडे बदलत असताना भिंतीच्या कोपर्यात असलेल्या पंडितच्या बॅगेशेजारी उभा ठेवलेला एक मोबाईल महिलेला आढळून आला. त्यानंतर त्या महिलेने तो मोबाईल हातात घेऊन पाहिला असता तो मोबाईल पंडितजीचा असल्याचे तिच्या लक्षात आले.
दरम्यान, त्या मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉडिंग करण्याचे काम चालू होते. फिर्यादी यांची पूर्ण खात्री झाली की, अमोल पंडित याने माझे नग्न अवस्थेतील चित्रीकरण करण्यासाठी त्याच्या मोबाईलचे व्हिडिओ रेकॉडिंग चालू करून भिंतीलगत मोबाईल उभा केला आहे. मोबाईलमध्ये रेकॉडिंग करुन विनयभंग केला आहे. ही बाब लक्षात येताच तिने लोणीकंद पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. त्यावरून पोलिसांनी अमोल पंडित ऊर्फ टोणगावकर याला अटक केली आहे.