लोणी काळभोर (पुणे) : “प्रोटोकॉल” पुर्ण करत नसल्याच्या कारणावरुन थेऊर सर्कल कार्यालयाकडून लोणी काळभोर व कोलवडी गावातील तब्बल ३६ फेरफार नोंदी रद्द केल्याच्या प्रकरणाचा धुरळा खाली बसण्यापुर्वीच, त्याच कार्यालयातील तलाठी बाईंनी सातबारावर नोंद करण्याच्या नावाखाली एका शेतकऱ्याकडुन तीस हजार रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.
थेऊरच्या तलाठी सरला पाटील व एक शेतकरी यांच्यात झालेल्या आर्थिक व्यवहाराची व्हिडिओ व ऑडिओ क्लिप “पुणे प्राईम न्यूज” च्या हाती लागली आहे. या दोन्ही क्लिपमधुन थेऊर तलाठी व सर्कल कार्यालयात महसुली कामांच्या नावाखाली तलाठी व त्यांचे वरीष्ठ करीत असलेल्या आर्थिक व्यवहाराची कल्पना येते. दरम्यान थेऊर सर्कल व तलाठी कार्यालत मागील तीन महिन्यांच्या काळात झालेल्या कामकाजाची चौकशी तटस्थ अधिकाऱ्याच्या माध्यमातून होण्याची गरज आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख या कार्यालयाची चौकशी करण्याचे धाडस दाखवणार का? असा प्रश्न पुर्व हवेलीतील नागरीक विचारत आहेत.
“प्रोटोकॉल” पुर्ण करत नसल्याच्या कारणावरुन थेऊर येथील सर्कल कार्यालयाकडुन लोणी काळभोर व कोलवडी गावातील तब्बल ३६ फेरफार नोंदी रद्द केल्याचा धक्कादायक प्रकार “पुणे प्राईम न्यूज”ने मंगळवारी उघड केला होता. पुर्व हवेलीत या घटनेची चर्चा दिवसभर सुरु असतानाच, थेऊरच्या एका शेतकऱ्याकडून एक छोटी नोंद लावण्यासाठी, थेऊरच्या तलाठी सरला पाटील यांनी तब्बल तीस हजार रुपये घेतल्याचा व्हिडीओ “पुणे प्राईम न्यूज” च्या हाती लागला. विशेष बाब म्हणजे वरील व्हिडिओ “पुणे प्राईम न्यूज”च्या हाती लागल्याचे समजताच, सरला पाटील यांनी संबधित शेतकऱ्याला पैसेही परत केल्याची माहिती पुढे आली आहे.
“पुणे प्राईम न्यूज”ला मिळालेल्या माहितीनुसार, थेऊर येथील एका शेतकऱ्याला गावातीलच विविध कार्यकारी सोसायटीमधून पीक कर्ज काढण्यासाठी त्याच्या शेतीची नोंद असलेला सातबारा हवा होता. यासाठी संबधित शेतकरी मागील पंधरा दिवसांपासून तलाठी कार्यालयात हेलपाटे मारत होता. मात्र, संबधित शेतकरी प्रोटोकॉल बद्दल बोलत नसल्याने, थेऊरच्या तलाठी या शेतकऱ्याला फेरफार नामंजूर होईल. त्यासाठी वरिष्ठांचे हात ओले करावे लागतील, यासाठी पन्नास हजारांची मागणी करत होत्या. अखेर खेटे मारून थकलेल्या शेतकऱ्याने तीस हजार रुपयांची तयारी दर्शली. यावर थेऊरच्या तलाठी महोदयांनी संबधित शेतकऱ्याचा सातबारा करण्याबाबत स्वतःसाठी व त्यांच्या वरीष्ठ अधिकारी म्हणजेच सर्कल मॅडमसाठी तीस हजार रुपये उकळले. मात्र, या सिस्टीमवर चिडलेल्या संबधित शेतकऱ्याने तलाठी व त्याच्यात झालेला आर्थिक व्यवहार, त्या संदर्भातील संभाषण हे मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले होते.
माझ्याकडून खूप मोठी चूक झाली…
दरम्यान संबंधित शेतकऱ्याकडील व्हिडिओ व ऑडिओ क्लिप “पुणे प्राईम न्यूज”च्या हाती लागल्याचे समजताच, थेऊरच्या तलाठी पाटील यांनी संबंधित शेतकऱ्याची भेट घेण्याचा प्रयत्न केला. तसेच तुमच्या नोंदीबाबत माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. अशी चूक मी पुन्हा करणार नाही. मला माफ करा, असे म्हणत शेतकऱ्याकडून घेतलेले तीस हजार रुपये परत केले. शेतकऱ्याने काढलेली व्हिडीओ क्लिप पाहिल्यास थेऊरच्या सर्कल व तलाठी कार्यालयाचा अत्यंत हीन दर्जाचा कारभार दिसुन येतो. थेऊरच्या सर्कल व तलाठी “प्रोटोकॉल” साठी हातात हात घालुन काम करत आहेत. आता तरी हवेलीचे तहसीलदार व प्रांत अधिकारी याबाबत तोंड उघडणार का? सदर घटनेची चौकशी करणार का? असे अनेक प्रश्न नागरीक विचारत आहेत. याबाबत थेऊरच्या तलाठी सरला पाटील यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
View this post on Instagram
सर्वच ”मिंधे”, मग कारवाई कोण करणार..
पुर्व हवेलीत आलेले काही तलाठी वीस ते पंचवीस लाख रुपये देऊन या जागेवर आल्याची चर्चा मागील काही महिन्यांपासून सुरु आहे. पुर्व हवेलीमधील एका “बड्या” गावचा चार्ज देण्यासाठी एका वरीष्ठ अधिकाऱ्याने तलाठ्याकडुन पंचवीस लाख रुपये घेतल्याची चर्चा सुरु आहे. पैसे वरीष्ठांनी घेतले, बदलीचे खापर मात्र तालुका स्तरावरील एका मोठ्या अधिकाऱ्याच्या डोक्यावर फोडले आहे. तर दुसरीकडे एक सर्कल “नाना” तऱ्हा करुन मंत्रालयातील सर्वोच्च पदाचा वापर करत आणि पन्नास लाख रुपयांच्या बदल्यात हवेलीत आल्याची चर्चा आहे.
या संपूर्ण घडामोडीविषयी “पन्नास लाख रुपये” हा शब्द खूप प्रसिद्ध झाला व त्याची सुरु असलेली वसुली याविषयी पुणे जिल्ह्यात चर्चेचा विषय बनलाआहे. जो फेरफारसाठी प्रोटोकॉलनुसार भेटतो, त्यांचा फेरफार मंजूर होतो. जो भेटत नाही, त्यांचा फेरफार नामंजूर या साध्या व सरळ समीकरणाची चर्चा पुर्व हवेलीत रंगू लागली आहे. त्यामुळे मंत्रालयातील सर्वोच्च पदापासूनते वरीष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वच ”मिंधे” आहेत, मग कारवाई कोण करणार? असा प्रश्न उभा राहिला आहे.