पुणे : पुणे जिल्ह्यातुन धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध बैलगाडा मालक पंडित जाधव यांचे अपहरण करून खून करण्यात आल्याची घटना घडल्याचे उघडकीस आली आहे. आरोपींकडून 50 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. मात्र, जाधव यांनी आरोपींची मागणी मान्य न केल्याने त्यांचा खून करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे येथील प्रसिद्ध बैलगाडा मालकाचे अपहरण करून खून करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 21) उघडकीस आली. पंडित रामचंद्र जाधव (वय 48, रा. जाधववाडी, नवलाख उंब्रे, ता. मावळ, पुणे) असे खून झालेल्या बैलगाडा मालकाचे नाव आहे.
पंडित जाधव यांचे 14 नोव्हेंबर रोजी खंडणीसाठी अज्ञातांकडून अपहरण करण्यात आले. त्यानंतर आरोपींनी 50 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. ती मागणी मान्य करण्यास पंडित जाधव यांनी नकार दिल्याने आरोपींनी जाधव यांचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळला आहे. या प्रकरणी खंडणी विरोधी पथकाने सुरज वानखेडे याला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलिसांकडून केला जात आहे.
पंडित जाधव यांच्याकडे मॉगी नावाचा एक बैल आहे. त्याने अनेक शर्यतीमध्ये मैदानात बाजी मारली आहे. त्यामुळे जाधव हे पंचक्रोशीत लोकप्रिय झाले होते.