पुणे : पुणे पोलिसांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील ड्रग्ज रॅकेट उघडकीस आणल्यानंतर अंमली पदार्थांविरोधात कडक कारवाईचे धोरण राबविण्यास सुरवात केली आहे. आता ड्रग्ज पेडलरकडे पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. याच मोहिमेअंतर्गत पोलिसांनी समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापा टाकला असता, पोलिसांना पाहताच एका ड्रग्ज पेडलरला (वय ५२) अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. माफियाला रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. त्याच्यावर यापूर्वी ड्रग्ज विक्रीचे गुन्हे दाखल आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हृदयविकाराने मृत्युमुखी पडलेला माफिया पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. यापूर्वी पोलिसांनी ड्रग्ज माफियांच्या घरी सर्च ऑपरेशन केले असता माफिया त्याच्या नाना पेठेतील घरी आल्याची माहिती खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांचे पथक माफियाच्या घरी गेले. पोलिसांनी दरवाजा ठोठावला असता, माफियानेच दरवाजा उघडला. समोरच पोलीस दिसताच त्याची भंबेरी उडाली. पोलिसांना पाहताच माफिया घाबरून खाली कोसळला.
दरम्यान, पोलिसांनी आणि माफियाच्या घरच्यांनी तातडीने त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून हृदयविकाराचा तीव्र झटक्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
पोलिसांनी माफियाच्या नाना पेठेतील घराची झडती घेतली असता, त्याच्या घरात काही ग्रॅम वजनाचे ड्रग्ज सापडले. समर्थ पोलीस ठाण्यात याबाबत नोंद करण्यात आली आहे.