पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय ड्रग्स प्रकरणात गुन्हे शाखेने आतापर्यंत ४ हजार कोटींहून जास्त रुपयांचा ड्रग्जसाठा जप्त केला आहे. या प्रकरणात आतापर्यंत आठ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी आरोपींचा मोबाईल डेटा तपासल्यानंतर पोलिसांना गुन्हेगारांची टोपण नावे समजली आहेत. राज्यासह देशभरात मेफेड्रॉनची तस्करी करण्यासाठी आरोपींनी नावांचे कोडिंग वापरले आहे. या नावाचा वापर करत पेडलर ड्रग्जची तस्करी करत असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
ड्रग्ज रॅकेटमध्ये “लंबा बाल” आणि “मुंबई का बंदर” या टोपण नावांचा वापर करण्यात आला. सराईत वैभव माने याला केसांची शेंडी होती. त्यामुळे त्याला “लंबा बाल” म्हणून ओळखले जात होते. मुंबईत राहणारा युवराज भुजबळ याला “मुंबई का बंदर” म्हणून बोलावले जात होते. आरोपींचा मोबाइल डेटा रिकव्हर केल्यानंतर गुन्हे शाखेला कोडिंगची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. राज्यासह देशभरात मेफेड्रॉनची तस्करी करण्यासाठी आरोपींनी नावांचे कोडिंग वापरले आहे.
कुरकुंभ एमआयडीसी येथील एका कारखान्यात तयार होत असलेल्या ड्रग्सला “कोडवर्ड” दिला होता. एमडी ड्रग्स बनवायच्या फॅार्म्युलाचा कोड वर्ड “न्यू पुणे जॅाब” असा होता. कुरकुंभ येथील असणाऱ्या अर्थकेम कारखान्यात एमडी ड्रग्ज तयार केले जात होते. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने कुरकुंभ येथे केलेल्या कारवाईत ६५० किलो एवढे ११०० कोटी रुपयांचे एम डी ड्रग्ज जप्त केले होते.
दरम्यान, “न्यू पुणे जॅाब”ची जबाबदारी युवराज भुजबळवर होती, असे तपासात उघड झाले आहे. भुजबळ हा केमिस्ट्री विषयातील पीएचडी धारक असून त्याला डोंबिवलीमधून अटक करण्यात आली. ॲाक्टोबर २०२३ पासून तो एमडी ड्रग्जची निर्मिती करत होता. अँटी मलेरिया ड्रग कॉंपोनंट आणि ॲंटीरस्ट हे २ रसायन कुरकुंभमधील कारखान्यात तयार होत होते.
पुणे पोलिसांनी तब्बल ४ हजार कोटी रुपयांचे दोन हजार किलो एमडी ड्रग्ज गेल्या चार दिवसांत जप्त केले आहे. पुणे, विश्रांतवाडी, कुरकुंभ, दौंड, सांगली आणि राजधानी दिल्लीमध्ये मागील दोन दिवसांत ही कारवाई केली आहे. गुन्हे शाखेकडून वैभव उर्फ पिंट्या माने आणि त्याच्या साथीदारांना पकडून साडेतीन कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त केल्यानंतर पोलिसांच्या कारवाईला सुरुवात झाली. भैरवनगरमधील गोदामातून ५५ किलो ड्रग्ज जप्त केले. दौंडमधील कुरकुंभ एमआयडीसीमधील अर्थकेम कारखान्यावर छापेमारीत करत पोलिसांनी ६०० किलोपेक्षा जास्त ड्रग्ज जप्त केले.