पुणे : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आपल्या दारुच्या व्यसनाविषयी आई आणि पत्नीला सांगत असल्याने घरात वाद होत. त्याच रागातून तरुणावर वार करून त्याचा खून केल्याची घटना समोर आली आहे. हडपसर पोलिसांनी याप्रकरणात सोलापूरहून दोघांना ताब्यात घेतलं असून पोलिसांनी १२ तासाच्या आत खुनाचा गुन्हा उघड केला आहे. अमोल ऊर्फ भावड्या मारुती माने (वय ३९, रा. रामोशी आळी, हडपसर) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी वैभव गणेश लबडे (वय ३१, रा. हिंगणे आळी, हडपसरगाव) आणि ज्ञानेश्वर दत्तु सकट (वय २७, रा. रामोशी आळी, हडपसर) यांना अटक केली आहे.
या प्रकरणाबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल माने हा केटरिंगचे काम करत होता. तो एकटाच रहात होता. त्याची बहिण संगीता कुलकर्णी ही त्याला फोन करत होती. परंतु तो फोन उचलत नव्हता. त्यामुळे तिने त्यांच्या ओळखीच्या एका व्यक्तीला १९ सप्टेबर रोजी रात्री अमोलच्या घरी पाठविले. तेव्हा त्या व्यक्तीला अमोल माने हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. याबाबत पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला.
व्यसनाबाबत घरी सांगत होता म्हणून खून..
परिसरातील सीसीटीव्ही व मिळालेल्या माहितीच्या आधारे वैभव लबडे याला हडपसर भागातून तर ज्ञानेश्वर सकट याला सोलापूर येथून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर खूनामागचे कारण समोर आले आहे. अमोल माने आणि वैभव लबडे हे एकमेकांचे मित्र होते. त्यांना दारु पिण्याचे व्यसन होते. अमोल हा वैभवला असलेल्या व्यसनाविषयी वेळोवेळी त्याच्या आईला व पत्नीला सांगत असे. त्यामुळे वैभव याचे त्याच्या आई व पत्नीबरोबर वाद होत असत. अमोल हा वेळोवेळी त्याच्या नशेबद्दल सांगून आई व पत्नीला भडकवत असल्यामुळे वैभव याच्या मनात अमोलबाबत राग निर्माण झाला. या रागातूनच आरोपीने त्याचा खून केल्याची कबुली दिली.
वैभव लबडे हा टेम्पोचालक आहे. ज्ञानेश्वर सकट हा अमोल माने याच्या जवळ राहतो. वैभव व ज्ञानेश्वर यांनी लोखंडी रॉड अमोल याच्या डोक्यात मारुन त्याचा खून केला. त्यानंतर ज्ञानेश्वर सकट हा पळून गेला होता. पोलिसांनी त्याला सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथून ताब्यात घेतल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे तपास करीत आहेत.