दीपक खिलारे / इंदापूर : शासन निर्धारित 34 रुपये दराप्रमाणे दुधाची शेतकऱ्यांकडून खरेदी करावी या मागणीसाठी इंदापूर तहसीलसमोर शिवधर्म फाउंडेशनच्या वतीने गेली अकरा दिवसांपासून आमरण उपोषण सुरू होते. अखेर गुरुवार दि.14 हे आमरण उपोषण मागे घेत असल्याचे आंदोलन कर्ते शिवधर्म फाउंडेशन चे अध्यक्ष दीपक काटे यांनी सांगितले.
आंदोलनकर्ते दीपक काटे आणि माऊली वणवे हे दोघे या ठिकाणी आमरण उपोषणाला बसले होते. राज्य सरकारच्या वरिष्ठ पातळीवर बैठका सुरू असून दोन दिवसांत दूध दर प्रश्नावर तोडगा निघेल असे आश्वासन जिल्हा दुग्ध विकास अधिकारी सतीश डोईफोडे यांनी आंदोलकांना दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.
या संदर्भात आंदोलन दीपक काटे म्हणाले की, गेल्या ११ दिवसांपासून आमचा संघर्ष सुरू होता. बुधवारी दिनांक 13 डिसेंबर रोजी राज्य सरकारची दूध खरेदीदारांसोबत बैठक पार पडली आहे. यासोबत आज गुरुवारी देखील बैठक पार पडली आहे. पुढील दोन दिवसांत राज्य सरकारचा आदेश पारित होईल. आमची जी मागणी होती की शासन निर्णय 34 रुपये प्रति लिटर दराप्रमाणे शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करावी ही मागणी पूर्ण होत आहे. त्यामुळे उपोषण मागे घेतले.
मंत्री विखे पाटील यांकडून नागपूरमध्ये बैठकीसाठी निरोप आला आहे. राज्यसरकारने दोन दिवसात निर्णय घेतला नाही.तर पुन्हा संविधानिक पद्धतीने उपोषण करणार असल्याचे दीपक काटे यांनी सांगितले.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची आंदोलनकर्त्यांशी भेट
गेली दहा दिवसांपासून दूध दरासंदर्भात शिवधर्म फाउंडेशन चे दीपक काटे व मारुती वणवे यांचे आमरण उपोषण सुरु होते. दरम्यान आंदोलन कर्ते मारुती वणवे यांची प्रकृती ढासळ्याने त्यांना उपचाराकरीता दवाखान्यात दाखल केले होते. येथील गंभीर परिस्थिती लक्षात घेता.माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी दि.13 आंदोलनकर्ते दीपक काटे यांची भेट घेतली होती. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती व आंदोलन कर्ते यांचे प्रश्न दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना प्रत्यक्षात भेटून चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते.
दीपक काटे यांनी लिहिले स्वत:च्या रक्ताने पत्र
शासनाने निर्धारित केलेल्या 34 रुपये दूधदरासंदर्भात तहसील कार्यालय येथे आमरण उपोषण सुरु होते. आंदोलनाच्या दहाव्या दिवशी आंदोलन कर्ते दीपक काटे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना स्वतः च्या रक्ताने पत्र लिहून दूध उत्पादक शेतकरी व आंदोलन कर्ते यांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवल्या होत्या.