पुणे : मी लढणार, मी निवडणुकीला उभं राहणार आणि निवडूनही येणार असा विश्वास शिरुर मतदारसंघात आढळराव पाटील यांनी व्यक्त करत अमोल कोल्हेंना आव्हान दिलं आहे. दरम्यान यामुळे अमोल कोल्हेंची डोकेदुखी पुन्हा वाढणार का याकडे लक्ष लागून राहिलंय.
कोल्हेंना थेट आव्हान
शिरुर मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अमोल कोल्हे खासदार आहेत. पण या जागेवर शिंदे गटाकडून आढळराव पाटील इच्छुक असल्याच्या चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरु होत्या. त्यातच आता आढळराव पाटलांनी लढणार, निवडून येणार हा विश्वास व्यक्त केल्यांने, हे अमोल कोल्हेंना थेट आव्हान तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
निवडून येणार हे पूर्ण सत्य
तिन्ही पक्ष एकत्र येऊन या जागे संदर्भात निर्णय घेतील. ज्या पक्षाला ही जागा जाईल त्या पक्षासाठी इतर दोन पक्ष काम करतील. मी लढणार, मी निवडणुकीला उभं राहणार आणि निवडून येणार हे पूर्ण सत्य आहे, असे आढळराव पाटील म्हणाले आहेत. राज्यभरात 14 जानेवारी रोजी महायुतीकडून मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यावेळी आढळराव पाटलांनी मतदारसंघावर भाष्य केलं. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अजित पवारांकडून या मतदारसंघासाठी दावा करण्यात आला होता. त्यानंतर महायुतीमध्ये पुन्हा एकदा एका मतदारसंघावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात होती.
महायुतीमध्ये वादाची शक्यता
अमोल कोल्हे यांना आगामी लोकसभा निवडणुकीत पाडणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केल्यापासून शिरूर लोकसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे मागच्यावेळी या लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्यावतीने शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादीकडून अमोल कोल्हे मैदानात होते. मात्र, या दोन्ही पक्षात आता दोन गट निर्माण झाले आहेत. शिवाजीराव आढळराव पाटील शिंदे गटात आणि अमोल कोल्हे शरद पवार गटात आहेत.