युनूस तांबोळी
Shirur News : शिरूर : रंगमंचावरील कला ही शाश्वत व जिवंत कला म्हणून ओळखली जाते. लोकनाट्य तमाशा या कलेत नृत्य, साज, श्रृंगार, ताल, सूर, संगीत आणि शाहिरी बोलावर अधिराज्य मिळवलेले दिग्गज कलाकार रंगमंचावर प्रबोधन करता करता दुःखातही सुखाची सुरेल झालर फुलवताना दिसतात. मनोरंजनाच्या दुनियेत तमाशा ही कला लोप पावत चालली आहे. मात्र, तमाशा कलावंतांना पाहिलं की आर्थिक ओझ्याने आणि वार्धक्याने शरीर साथ देत नसले, तरी समाजाप्रती प्रबोधनाचा घेतलेला वसा आणि अंगातील कला जिवंत ठेवण्यासाठी हे कलाकार प्रतिकूल परिस्थितीत मोठ्या तळमळीने कार्यरत असतात. खऱ्या अर्थाने हे रंगमंचावरील आगळेवेगळे मोहरे आहेत, हे विसरून चालणार नाही.
तमाशा कलेतही व्हावे बदल…
प्रेक्षकांच्या आवडी-निवडीत बदल होत असून, मनोरंजनाच्या कलेला वेळेच बंधन आले आहे. मनोरजंनाची अनेक साधने उपलब्ध झाली आहेत. जुन्या कलेचा चाहता वर्ग देखील कमी झाला आहे. त्यातून सामाजिक प्रबोधनाच्या दृष्टीने कलेला महत्त्व देणारा कलाकार वर्ग देखील कमी झाल्याचे पहायला मिळतो. कलेच्या दुनियेची साथ ही सगळ्यात महत्वाची गोष्ट समजली जाते. साथ एकदा सुटली की विनोद आणि प्रबोधन याची सांगड घालताना होणारी शब्दफेक तुटते. (Shirur News) त्यातून त्या कलेचा मुख्य गाभारा नाहीसा होतो. त्या कलेतील तोचतोचपणा दिसू लागल्याने विनोदातील मर्म निघून जाते. बोलके होणार नृत्य देखील कंटाळवाणे झाल्याने प्रेक्षक देखील त्यापासून दूर जाताना दिसतात. जुन्या लोकनाट्य तमाशात तुकाराम खेडकर, पांडुरंग मुळे मांजरवाडीकर, चंद्रकांत ढवळपूरीकर, रघूवीर खेडकर, काळू-बाळू, दत्ता महाडी पुणेकर, गुलाब बोरगावकर, गंगारामबुवा कवठेकर, अशोक पारगावकर, मंगला बनसोडे, कांताबाई सातारकर, विठाबाई नारायणगावकर या आणि अशा अनेक कलाकारांनी तमाशा कलेत साथ मिळाल्यानेच नावलौकीक मिळवला आहे. त्यामुळे प्रत्येक कलेच्या क्षेत्रात नाविन्याला महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळे जुन्या पारंपरिक लोकनाट्य तमाशा कलाकारांनी बदलण्याची गरज आहे.
जुन्या-नव्याची घाला सांगड…
यात्रा-जत्रांमध्ये छबिन्यानंतर सुरू होणारा लोकनाट्य तमाशा ही ग्रामीण भागातील मनोरंजन विश्वातील वेगळी कला होती. सकाळी सहा वाजेपर्यंत चालणारा लोकनाट्य तमाशा हे मुख्य मनोरंजनाचे साधन होते. त्यातून दिग्गज कलाकारांनी समाजमन बदण्याचा प्रयत्न केला आहे. नृत्य, साज, श्ऱंगार, ताल, सूर, संगीत आणि शाहिरी बोलावर अधिराज्य मिळवलेल्या दिग्गज कलाकारांनी त्यातून नावलौकीक मिळवल्याचे दिसून येते. कलेच्या माध्यमातून एकमेकांना दिलेली साथ लाखमोलाची ठरली होती. गण, गवळण, रंगबाजी, फार्स आणि वग यामध्ये नटलेला लोकनाट्य तमाशा (Shirur News) ही कला मनोरंजनाच्या दुनियेत मानाचा तुरा घेऊन मिरवणारी होती. वार्धक्याने जुन्या कलाकारांची फळी हळूहळू गायब होत गेली. त्यातून कलाकारांची पिढी संपली त्याबरोबर प्रेक्षक देखील बदलल्याचे चित्र आहे. सध्या लोकनाट्यात तेच तेच विनोद आणि संगीतामध्ये जिवंत सूर हरपल्याचे दिसून येते. त्यामुळे लोकनाट्य तमाशाची मागणी घटत चालली आहे. जुन्या नव्या प्रेक्षकवर्गाची मागणी पाहून, सांगड घालून पुन्हा तमाशाची कला उभी केली पाहिजे.
जुन्या लोकनाट्यातील कलाकार मोहरे…
जुन्नर तालुक्यातील नारायणगाव ही तमाशाची पंढरी समजली जाते. या पंढरीत अनेक दिग्गज कलावंतानी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त केला आहे. अनेकांनी जीवन गौरव सन्मान मिळवला. या जुन्या कलावंतांनी कष्ट करून लोकनाट्य तमाशाच्या कलेचे जतन केले आहे. त्यामुळे आताच्या नवीन कलावंतांना या कलेची गोडी पहावयास मिळत आहे. गणात शिलेदार होऊन पहाडी आवाजात गण आणि पोवाड्याचे सादरीकरण प्रत्येकाला आवडणारी कला होती. त्यातील हलगी, तुणतुण्यावर ढोलकीच्या साथीने शाहिर अन् झेलकऱ्यांनी मिळवलेली दाद आज देखील आठवणीतली कला आहे. पण सध्या अनेक तमाशातून हलगी गायब झाल्याची दिसून येते. गवळण मधून वाजणारी ढोलकी मुख्य स्थानी असायची. त्यातून नृत्याची बिजली म्हणूनच नृत्यांगनाची ओळख व्हायची. अनेक दिग्गज नृत्यांगनांनी लोकनाट्य तमाशा क्षेत्रात नावलौकीक मिळवला आहे. पण आता संपूर्ण तमाशात एक गवळण आणि जिवंत वाद्याचा अपवाद पहावयास मिळतो. अन्यथा रेकॅार्ड केलेली गाणीच वाजवली जातात. त्यामुळे गवळण हा हसण्यावारी नेण्याचा विषय ठरू पाहत आहे.
वगनाट्यातून मोलाचा संदेश
फार्स हा तमाशातील मनोरंजनाचा तडका देणारा विषय असायचा. त्यातील शब्दफेक आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. जग्गनाथ शिंगवेकर यांनी केलेल्या शब्दफेकीतून होणारे मनोरंजन आजही प्रख्यात आहे. संगीतपेटी, हलगी, ढोलकी, टाळ, तुणतुणे यामध्ये विनोदवीरांच्या विनोदाने रंगबाजीला रंगत चढायची. पण नवीन प्रेक्षकांनी याला म्युझिकल पार्टीचे रूप दिले आहे. येथे परिस्थितीनुसार बदललेला तमाशा पहावयास मिळतो. शेवटी धार्मिक, ऐतिहासिक, राजकीय, कौटुंबिक विषयावर होणारे वगनाट्य हा खूप मोलाचा संदेश देणारा होता. (Shirur News) यासाठी दिग्गज कलाकांराची वर्मी लागायची. पाच तोफांची सलामी, संत तुकाराम, बापू बिरू वाटेगावकर, गवळ्याची रंभा, वेगवेगळ्या अनेक विषयांवरील वग आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. मनोरंजनाची अनेक साधने झाल्याने वगासाठी प्रेक्षकांना वेळ नसतो. त्यातून प्रेक्षक थांबत नसल्याचे चित्र आहे.
जुन्या लोकनाट्याची जोपासना करायची असेल तर या कलाकारांनी पुन्हा एकवटले पाहिजे. कलेला नवरूप देऊन संघटना केली पाहिजे. कलाकाराचे प्रश्न सुटले पाहिजेत, जेष्ठ कलाकारांना मानधन मिळाले पाहिजे, जत्रेत कलाकारांना संरक्षण मिळाले पाहिजे, योग्य बिदागी देऊन कलाकाराचा सन्मान झाला पाहिजे, अनेक प्रश्नांची सोडवणूक झाली पाहिजे, तरच महाराष्ट्रात लोकनाट्य तमाशा हे पुन्हा उदयास येऊ शकते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :