धनजंय साळवे
Shirur News : कवठे येमाई : ग्रामीण भागात शालेय विद्यार्थ्यांमध्ये एका लाल रंगाच्या शीतपेयाची प्रचंड क्रेझ निर्माण झाली आहे. शाळा भरण्याच्या सुमारास, मधल्या सुटीच्या दरम्यान, तसेच संध्याकाळी शाळा सुटल्यावर अनेक विद्यार्थी शीत पेयांच्या दुकानात गर्दी करत आहेत. यामध्ये मुलींचे प्रमाण लक्षणीय आहे. शीतपेयांचे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात, ही बाब लक्षात घेऊन याबाबत समुपदेशन होणे गरजेचे आहे, असे मत बालरोग तज्ज्ञ डॉ. संतोष उचाळे यांनी व्यक्त केले.
शीतपेयांचे आरोग्यावर गंभीर परिणाम
उचाळे म्हणाले की, शीतपेय शरीराला घातक असतात. मुले याबाबत मोठ्यांचे अनुकरण करतात. मोठ्या माणसांना पाहून आपणही हे केले पाहिजे, अशी त्यांची मानसिकता होते. (Shirur News) पुढे जाऊन हीच मुले मोठ्या व्यसनांच्या आहारी जातात. त्यामुळे योग्य वेळी त्यांना समज देणे आवश्यक आहे.
मुलांना खाऊसाठी पालक पैसे देत असतात. परंतु या पैशांचे मुले काय करतात, हे कधी पालक विचारत नाहीत. हीच मुले आपल्या मित्र-मैत्रिणींना घेऊन शीतपेयांच्या दुकानात शीतपेय पिण्यासाठी गर्दी करत आहेत. वाढदिवसाच्या बहाण्याने वा मित्र मैत्रिणींच्या आग्रहाखातर घेतलेल्या शीतपेयांचे व्यसनात रूपांतर कधी होते, हे अनेकदा कळत नाही. (Shirur News) बरीच मुले उपहारगृहात आपल्या पालकांबरोबर जातात. त्यावेळी सर्रास ही शीतपेये घेताना दिसतात. पालकांना यातील धोके कळत नाहीत. शीतपेयांमुळे काही ठिकाणी मुलांच्या जीवावर बेतल्याच्या घटना घडलेल्या दिसून येत आहेत. परंतु त्याची वाच्यता कुठेही होत नाही, असेही उचाळे यांनी सांगितले.
या शीतपेयांमध्ये अत्यंत घातक अशा ब्रोमीनेटेड व्हेजिटेबल ऑईलचा समावेश आहे. यामध्ये रासायनिक व कृत्रिम पदार्थांचा सर्रास वापर केला जातो. त्यामुळे शितपेय घातक आहेत. तसेच यामध्ये कार्बनडाय-ऑक्साइड आदींचा वापर केला जातो. फॉस्फरिक ऍसिडमुळे शरीरातील पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम यांचे प्रमाण बिघडते. त्यामुळे अनेक गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. सातत्याने शीतपेये पिल्याने पचनक्रिया मंदावते तसेच शरीराची चरबी वाढते. लहान वयातच मधुमेहासारखे आजार वाढतात. (Shirur News) हृदयाचे आजार जडून अकाली मृत्यू येऊ शकतो.
शीतपेयामध्ये असणाऱ्या कॅफेनमुळे शरीराला आवश्यक असणारे कॅल्शियम लघवीवाटे बाहेर पडते. त्यामुळे हाडे ठिसूळ बनतात, दातांचे विकार जडतात. दोनपेक्षा अधिक शीतपेय पिल्यास मुलांना गुंगी येते. त्यामुळे मुलांना आपण वेगळ्याच दुनियेत आहे असे वाटते. पालकांनी व शिक्षकांनी या मुलांचे समुपदेशन करणे गरजेचे आहे.(Shirur News) यामुळे मुलांना आपण आजारपणात तर ढकलत नाही ना, असा प्रश्न उपस्थित राहत आहे, असे उचाळे यांनी सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : मिडगुलवाडी ड्रग्जप्रकरणी जागा मालकावर गुन्हा दाखल
Shirur News : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात भाद्रपदी बैलपोळा उत्साहात
Shirur News : सुगरणींची खोपे देताहेत विणीच्या हंगामाची चाहूल…!