शिरूर: शिरूर पोलीस स्टेशनच्या शहर वाहतूक शाखेने वेळोवेळी कारवाई करून कर्कश आवाज करणाऱ्या व फटाके फोडणाऱ्या बुलेट गाड्यांचे सायलेन्सर काढून घेऊन जप्त केले होते.त्या सायलेन्सरची आज(दि.17) पोलिसांनी विल्हेवाट लावली असून, त्यावरून रोलर फिरवले.
शिरूर शहराच्या विविध भागातून कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट गाड्यांचे सायलेन्सर पोलिसांनी मागील काही दिवसांपासून कारवाई करून जप्त केले. अशाच पद्धतीची कारवाई शिरूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील मांडवगण फराटा, न्हावरे, शिक्रापूर आणि टाकळी हाजी या महत्त्वाच्या गावांमध्येही सर्वत्र पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे.
पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी पुढे माहिती देताना सांगितले की, शिरूर शहर व ग्रामीण भागामध्ये सर्वत्र काळ्या काचा फिल्मींग असलेल्या फोर व्हीलर गाड्यांवर सक्त व दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तशी मोहीम पोलिसांनी हाती घेतली असून, लवकरच त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे फोर व्हीलर गाड्यांच्या काचांना काळ्या फिल्मिंग असणाऱ्यांची गय केली जाणार नाही. असे पोलीस निरीक्षक केंजळे यांनी सांगितले.
येथून पुढेही शिरूर शहरातील महाविद्यालये व शाळा परिसरामध्ये पोलिसांच्या गस्त सुरूच राहणार असून, रोड रोमियो व बेशिस्त युवक व वाहन चालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी पोलीस हवालदार राजेंद्र वाघमोडे व भाग्यश्री जाधव यांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे.