Shirur News : कवठे येमाई : येमाई देवीच्या मंदिरात शारदीय नवरात्रौत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती श्री येमाई देवी ट्रस्टचे मुख्य विश्वस्त विजयकुमार गोरे यांनी दिली. हा नवरात्र उत्सव रविवार (ता. १५) ते मंगळवार (ता. २४) या कालावधीत साजरा होणार आहे. अवघ्या महाराष्ट्रातील देवीचे हजारो भक्तगण या नवरात्रोत्सवात देवीचे दर्शन घेण्यासाठी सहकुटुंब येतात. श्री येमाई देवी अनेक कुटुंबियांचे कुलदैवत, तर गावचे ग्रामदैवत आहे. हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या या देवीचा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.
महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार
उत्सव काळात श्री येमाई देवीच्या मंदिरात ९ दिवस देवीची विविध रूपात जडावी सालंकृत पूजा बांधण्यात येते. या वेळी मंदिरात देवीसमोर पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात येते. देवीचे पारंपरिक ढोरके पुजारी, शिंदे गुरव परिवार यांच्याकडून देवीची नियमित पूजा केली जाते. (Shirur News) तसेच देवीसाठी नित्यालंकारासह नवरात्र काळात उत्सवासाठी पारंपरिक दागिन्यांबरोबरच देवीला रोज नऊ दिवस नऊ विविध रंगांचे वस्त्र परिधान केले जाते. देवीचे नऊ दिवसातील नऊ रंगांच्या वस्त्रांचे मूर्तिमंत रूप डोळ्यांत साठवण्याजोगे असते.
या काळात रोज सकाळी सप्तशती वाचन, गोंधळ, आरती, महापूजा, रोज सायंकाळी सप्तशती वाचन, आरती, पूजा, नैवेद्य, गोंधळ असे कार्यक्रम होणार आहेत. रविवारी (ता. २२) रात्री ९ ते १२ होम हवनाचा धार्मिक कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्यभरातून भाविक भक्त मुक्कामी हजेरी लावत असतात. यासाठी नाशिक पुणे या ठिकाणांवरून विशेष पुरोहित होमहवनासाठी बोलविले जातात. (Shirur News) त्यांना ग्रामपुरोहित जोशी कटुंबीय व गोरे कुटुंब मदत करतात. या वेळी गावातील गोंधळी, आराधी, भराडी हे पारंपरिक पद्धतीने आपला जागरण गोंधळ, भेदिक, कलगी तुरा यांचा कार्यक्रम देवीसमोर सादर करतात.
कवठे येमाई गावापासून तीन किलोमीटर अंतरावर हे देवीचे मंदीर आहे. मंदिराभोवती वृक्षारोपण केल्यामुळे येथील परिसर निर्सगरम्य बनला आहे. मंदिराच्या बाहेर जुन्या काळातील बारव आहे. मंदिराचा जीर्णोद्धार करून रंगरंगोटी करण्यात आली आहे. श्री येमाई देवी ट्रस्टकडून अनेक विकासकामे करण्यात आली आहेत व विकासकामे चालू आहेत. नवसाला पावणारी देवी म्हणून या मंदिरात भाविक दर्शनासाठी येत असतात. राज्यभरात भाविक मुक्कामी राहण्यास येत असतात. यासाठी येथे निवासस्थान बांधण्यात आले आहे. (Shirur News) नवरात्र उत्सव येथे मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. आसपासचे भावीक येथे पहाटे पायी चालत येऊन दर्शनासाठी गर्दी करताना दिसतात. जागरण गोंधळ, भजन, प्रवचन करून येथे हा उत्साह मोठ्या दिमाखात साजरा केला जातो.
या उत्सवासाठी मंदिरावर विद्युत रोषणाई व सभोतालची स्वच्छता, रंगरंगोटी करण्यात आली आहे. नवरात्रात अनेक शैक्षणिक सहली येथे येतात. दसऱ्याच्या दिवशी येथे भक्तांची प्रचंड गर्दी होते. (Shirur News) यामुळे वाहतुकीवर ताण येतो. कोंडी टाळण्यासाठी स्थानिक तरुण मदत करतात; परंतु महसूल विभाग, पोलीस प्रशासनाने मदत केली पाहिजे, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
गोंधळी समाजाकडून देवीची आरती
नवरात्र काळात पहाटे पाचला देवीची गोंधळी समाजाकडून आरती, सकाळी ९ वाजता व संध्याकाळी ७ वाजता शिंदेगुरव ढोरके भक्त यांच्या उपस्थितीत ओलांडा होत असतो. तसेच देवीची नियमित पूजा-अर्चा व देवीला अभिषेक गोरे-पाटील कुटुंबियांकडून केला जातो.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : फिनेलच्या नावाखाली ड्रग्ज निर्मिती; मिडगुलवाडीत तब्बल १७४ किलो ड्रग्जसाठा जप्त
Shirur News : एटीएम मधून पैसे काढून वृद्ध नागरिकांना मदत करण्याच्या बहाण्याने फसविणारा आरोपी गजाआड;