Shirur New : शिरूर : तडम ताशा अन् डफाचा निनाद…, सनईच्या सुरावर ढोल-ताशांची जुगलबंदी…, पारंपरिक भुतेबाबा…, विद्युत रोषणाई आणि फुलांनी सजवलेली पालखी… त्यात श्री येमाई देवीचा सजविलेला मुखवटा…, दारोदारी थांबवून पूजा करत भाविकांनी दर्शनासाठी केलेली गर्दी, त्यातून आई उदे गं अंबाबाईच्या जयघोषाने गोंधळ्याच्या संबळावर झालेल्या आरतीने कवठे येमाई (ता. शिरूर) येथे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त श्री येमाई देवी पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
ग्रहणामुळे सोहळ्याला गर्दी कमी
शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे श्री येमाई देवी कुलदैवत म्हणून प्रसिद्ध आहे. कवठे येमाई येथील बाराभाऊ बलुतेदार मंडळाच्या वतीने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त श्री येमाई देवी पालखी सोहळा पारंपरिक पद्धतीने मिरवणुकीने साजरा करण्यात येतो. (Shirur New) त्याप्रमाणे यावर्षी देखील विद्युत रोषणाई व फुलांनी पालखी सजविण्यात आली होती. सायंकाळी गावातून ग्रामपंचायतीच्या चावडीवरून पालखी सोहळा निघाला.
या वेळी पारंपरिक वाद्याने हा मिरवणूक सोहळा सुरू झाला. या पालखी सोहळ्याला भुतेबाबाची हजेरी आकर्षक ठरली. बाराभाऊ बलुतेदार मंडळाच्या वतीने या सोहळ्याचे नियोजन करण्यात आले होते. होळीच्या चौकादरम्यान हा पालखी सोहळा थांबविण्यात आला. (Shirur New) त्याठिकाणी ढोल-ताशांची जुगलबंदी पहावयास मिळाली. त्यानंतर संपूर्ण गावातून पालखी सोहळ्याची मिरवणूक संपन्न झाली. या वेळी भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पालखी सोहळा मिरवणूक पुन्हा चावडीवर आली. त्यावेळी श्री येमाई देवीची आरती करण्यात आली. त्यानंतर हा पालखी सोहळा विसर्जित करण्यात आला.
जुनी परंपरा…
कोजागिरी पौर्णिमेला बाराभाऊ बलुतेदार मंडळाची गावातून निघणारी ही पालखी पारंपरिक व आगळीवेगळी आहे. ही जुनी परंपरा आजही टिकून आहे. रात्र जागवून सुरू राहणारा हा पालखी सोहळा चार पिढ्यांपासून होतो. या काळात पाऊस असल्यास सोहळा लवकर विसर्जित केला जातो. रात्र जागविण्यासाठी मनोरंजनाचे कार्यक्रम तसेच बाराभाऊ बलुतेदार मंडळाची नाटके होतात. या परंपरेला देखील फाटा देण्यात आला आहे. पूर्वी या सोहळ्यात सोंग काढणे असे कार्यक्रम होत असत.
कोजागिरी पौर्णिमेवर ग्रहणाचे सावट…
शनिवारी (ता. २८) आक्टोबर रोजी दुपारी ३.३० पासून रविवारी २९ च्या पहाटे २.२३ वाजेपर्यंत खंडग्रास चंद्रग्रहणाचे वेध लागले होते. त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त करायची पूजा, दुधाचा नैवेद्य ग्रहण लागण्यापुर्वी करता होणार होता. प्रसाद म्हणून एक पळी दूध प्राशन करावे. उरलेले दूध दुसऱ्या दिवशी प्यावे, असे सांगण्यात आल्याने या सोहळ्याला गर्दी कमी होती.
चंद्रग्रहण का घडते…
जेव्हा सूर्य, पृथ्वी, आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात. तेव्हा ग्रहणे होतात. जेव्हा सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी येते तेव्हा पृ्थ्वीची सावली चंद्रावर पडते.(Shirur New) त्यामुळे चंद्रग्रहण होते. चंद्र ग्रहणाचे छायाकल्प, खंडग्रास आणि खग्रास असे तीन प्रकार आहेत. यावेळचे चंद्रग्रहण खंडग्रास प्रकारचे आहे. याच महिन्यात १४ ऑक्टोबरला कंकणाकृती सूर्यग्रहण झाले होते. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण एका मागोमाग येत असतात.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : मराठा आरक्षणप्रश्नी गावोगावी झळकले नेत्यांना गावबंदीचे फलक
Shirur News : निमगाव म्हाळुंगी येथे मराठा समाजाचा एकच निर्धार ‘आधी आरक्षण, मग इलेक्शन’
Shirur News : कवठे येमाई येथे मराठा समाजाचे चक्री उपोषण; गावात पुढार्यांना प्रवेश बंदी…!