साहेबराव लोखंडे
Shirur News : टाकळी हाजी : शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथे विजेचा लंपडाव सुरू असून, वारंवार वीज खंडीत होत असल्याने ग्रामस्थांबरोबरच शेतकऱ्यांना देखील अनके समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तत्काळ या भागाला अनुभवी वायरमन द्यावा व विजेचा लंपडाव थांबवावा, अशी मागणी परिसरातून होत आहे.
वायरमनवर कामाचा अतिरिक्त ताण
याठिकाणी १३३/११ केव्हीचे उपकेंद्र असून, येथून होत असलेल्या भागाचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. (Shirur News ) लोड शेडींगच्या वेळेव्यातिरिक्त क्वचितच काही तांत्रिक कारणांनी खंडित होणाऱ्या विजेचा लपंडाव सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
या भागात पाच वायरमनचे काम असतानाही जबाबदारी फक्त दोन वायरमनवर दिली गेल्याने त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण येत आहे. शिवाय सर्व परिसराची माहिती असणारा एकही वायरमन कार्यरत नाही. (Shirur News ) येथील वायरमनकडे तक्रार केल्यास त्यांना कोणत्या भागात दुरुस्ती करायची हे लक्षात येत नसल्याने पूर्ण फिडर बंद केले जाते. यामुळे वेगवेगळ्या भागांत काही तांत्रिक अडचण आली तरी त्या बाजूचा संपूर्ण वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
शिरूर तालुक्याचा बेट भाग हा कांद्याचे आगार समजला जातो. येथे गारवा कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. लवकरच रब्बी हंगामातील कांदा पिकाच्या लागवडीचा हंगाम सुरू होईल. त्यावेळी हा लपंडाव शेतकरी खपवून घेणार नाहीत. (Shirur News ) त्यामुळे यापूर्वी येथे कामाचा अनुभव असणारा एखादा तरी कर्मचारी संबंधित विभागाने नियुक्त करावा. नवीन कर्मचाऱ्यास या भागाची माहिती होईल, अशी मागणी राष्ट्रवादीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गावडे, टाकळी हाजी सरपंच अरूणा घोडे, सोसायटीचे अध्यक्ष बन्सीशेठ घोडे यांनी केली आहे.