योगेश पडवळ
Shirur News : पाबळ : एका पायाने दिव्यांग असलेला सातारा जिल्ह्यातील प्रमोद पंजाबराव पावडे हा तरूण कर्करोगावर यशस्वी मात करून दिव्यांगांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी एका पायाने सायकल चालवत ३०० किलोमीटरचे अंतर पार करून मंगळवारी (ता.२४) विजयादशमीच्या दिवशी किल्ले शिवनेरी जाणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी नतमस्तक होऊन सायकलीवरून मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागण्यांचे निवेदन द्यायला जाणाऱ्या प्रमोद पावडे या जिद्दी कॅन्सर फायटर दिव्यांग तरुणाचे आंबेगाव तालुक्याच्या हद्दीत पोंदेवाडी येथे नागरिकांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या.
दिव्यांगांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी
प्रमोद पावडे याचे मूळ गाव वडूज (ता. खटाव जि. सातारा) होय . प्रमोद २०१८ साली पडल्याने पायाला दुखापत झाली त्यामुळे एमआरआय केल्यावर हाडाला गाठ असल्याचे निदर्शनास आले. (Shirur News ) त्यामुळे पुढील तपासण्या केल्यानंतर हाडाचा कर्करोग असल्याचे निदान झाले. घरची परिस्थिती हलाखीची वडील मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात कर्करोगाचे निदान झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबाची पायाखालची जमीनच सरकली त्याही परिस्थितीत न डगमगता आजाराशी लढा देण्याचा निर्धार केला.
मुंबई येथे थांबून टाटा हॉस्पिटल मध्ये २०१९ मध्ये सुमारे आठ महिने प्रमोदने कर्करोगावर उपचार केले. त्यातून बरा होऊन घरीही आला परंतु त्यानंतर देशात कोरोना आला. (Shirur News ) त्याला पुढील काही तपासण्या व उपचारासाठी मुंबई येथे जाता आले नाही. दुर्दैवाने त्याच्या उजव्या पायात जंतूसंसर्ग झाल्याने गुडघ्यापासून त्याचा पाय कापावा लागला. आत्ता पर्यंत त्याच्यावर विविध एकूण सात शस्त्रक्रिया तसेच केमोथेरीपी झाली आहे.
प्रमोद पावडे याला आता एका पायाने कायम स्वरूप अपंगत्व आले आहे. एका पायामुळे त्याला कोणतेही काम करता येत नाही त्याला शासनाकडून दिव्यांगसाठी असणारे प्रती महिना एक हजार रुपये मानधन मिळते. (Shirur News ) तेही वेळेवर मिळत नाही. मानधन सुरु करण्यासाठी प्रमोद याला शासनदरबारी आठ महिने हेलपाटे मारावे लागले तेव्हा ते सुरु झाले.
दिव्यांगाना मानधन सुरु करण्यसाठी माझ्या सारखे हेलपाटे मारावे लागू नये. त्यांना शासकीय नोकरीच्या परीक्षेचे शुल्क आकारू नये, दिव्यांगाना घर देणे, मानधन पाच हजार करणे. (Shirur News ) उद्योग व्यवसाय सुरु करण्यसाठी आर्थिक मदत करणे एसटीमधून मोफत प्रवास तसेच आमदार निधीतून पाच टक्के निधी दिव्यांग कल्याणावर खर्च करणे या मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी १४ ऑक्टोबरपासून वडूज येथून एका पायाने सायकल चालवत ३०० किलोमीटरचे अंतर पार करून मंगळवार दि. २४ विजयादशमीच्या दिवशी किल्ले शिवनेरीवर पोहचणार आहे.
दरम्यान, प्रमोद शनिवारी (ता.२१) आंबेगाव तालुक्यातील पोंदेवाडी पर्यंत प्रमोदने २४० किलोमीटर अंतर पार केले आहे. एका पायाने सायकल चालवत असलेला तरूण पाहून रस्त्याने प्रवास करणारे अनेक जण वाहन थांबवून प्रमोद पावडेची विचारपूस करत आहे. पोंदेवाडीयेथील वसंत नरवडे , मनोहर नरवडे, शांताराम पडवळ , संदीप पडवळ, सत्यवान पडवळ, शरद पडवळ, बबू किठे, विठ्ठल पडवळ, निखिल पडवळ, शुभम पडवळ,यांनी प्रमोद पावडे यांची विचारपूस करून रात्री मुक्काम तसेच जेवणाची व्यवस्था केली, नागरिकांच्या वतीने त्याचा सन्मानही केला.
विजयादशमीच्या दिवशी मंगळवारी (ता.२४) किल्ले शिवनेरीवर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी नतमस्तक होऊन स्थानिक दिव्यांगच्या सोबत तहसीलदार व स्थानिक आमदार यांना निवेदन देणार आहे. (Shirur News ) त्यांतर प्रमोद हा पुढे मुंबईला सायकलवरून जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागण्यांचे निवेदन देणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : सविंदणेत खेळ पैठणीचा कार्यक्रम संपन्न
Shirur News : कासारी येथे नवरात्री निमित्त ‘खेळ रंगला पैठणीचा’