युनुस तांबोळी
शिरूर, (पुणे) : हाफ पॅन्टी वरची ठिगळ पण दहावी पर्यंत फुल पॅन्ट मिळालीच नाही. उन्हाचे चटके बसले की पायात चप्पल पाहिजे हे आठवायच. दुपारच्या जेवनात मित्राच्या कोरड्या भाकरी बरोबर भाजी अन लाल मिरचीचा तो आस्वाद. तासनतास गप्पा अन खेळाच्या तासाला रंगलेला मैदानावरचा हशा. पावसाळ्यात वर्गाबाहेर बरसणारा पाऊस तर छताला घरटे केलेल्या चिमणीची चिवचिव. चुकला तर गुरूजीचा मार पण हुशारीला कौतुकाची पाठीवर थाप, प्राथमिक शिक्षणातील सुखदुखाःची ती दहा वर्षे निरागस, खेळकर आणी जीवनाला कलाटणी देणारी ठरली. आजही तो काळ आठवला की सर…पुन्हा या वर्गात येऊन बसावे वाटते. तुमचा आपुलकीचा मार, ते प्रेम अन वात्सल्य मिळवत रहावे.
पिंपरी पेंढार (ता. जुन्नर) येथील श्री सद्गुरू सिताराम महाराज विद्यालयातील १९८५ -८६ च्या… दहावी बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करत डोळ्यातील अश्रुंना वाट मोकळी करून दिली.
श्री सद्गुरू सिताराम महाराज विद्यालयात गेल्या ३७ वर्षांनी माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात पार पाडला. या स्नेह मेळाव्या मुळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या, अनेकांना गहिवरून आले होते. श्री गणेश प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली.
स्नेह मेळावा हा खेळीमेळीच्या वातावरणात असला तरी जुन्या आठवणींना उजाळा देणारा ठरला. या कार्यक्रमाचे जालिंदर चव्हाण, चंद्रकांत जाधव यांनी नियोजन केले होते. सूत्रसंचालन सुनील जाधव यांनी केले होते.
यावेळी गुरुवर्य शिक्षक किसन ढमाले, एकनाथ आहेर, गणपत शिंदे, बाजीराव चौगुले, सरदार नवले, बळवंत ठुबे यांचा सत्कार करण्यात आले. ३६-३७ वर्षानंतर वर्गमित्र एकत्र आल्याने वातावरण भारावून गेले होते. या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा देत अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आजच्या युगात तरुण पिढी बिघडली आहे असे म्हटले जाते. पण आमच्या १९८५-८६ च्या बॅचचे विद्यार्थी बिघडले नाही. तर चांगल्या संस्कारांची शिदोरी घेऊन त्यांची यशस्वीपणे वाटचाल चालू आहे. या बाबत समाधान शिक्षकांनी व्यक्त केले.
दरम्यान, विद्यार्थी हा जीवनात यशस्वी झाल्यावर शिक्षकांना त्याचा अभिमान असतो. कोणत्याही क्षेत्रात यश मिळाल्यावर विद्यार्थ्यांनी देखील भविष्यातील पिढी घडविण्याचे काम केले पाहिजे. त्यातून जीवनचक्र सुरू राहण्यास मदत होते. माझा विद्यार्थी घडला हाच त्या शिक्षकाचा पुरस्कार ठरतो. असे सरदार नवले सर यांनी मत व्यक्त केले.