नसरापूर,(पुणे): राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिंदेवाडी (ता. भोर) हद्दीतील जुन्या बोगद्याजवळ झालेल्या खुनाची उकल अवघ्या 12 तासात करण्यात राजगड पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी 6 जणांना ताब्यात घेतले असून यामध्ये तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. प्रेमसंबधात अडचण ठरत असल्याच्या रागातून हा खून केल्याचे आरोपींनी कबूल केले आहे. अशी माहिती राजगड पोलिसांनी दिली आहे. पोलीसांनी तात्काळ केलेल्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
श्रीमंत अनिल गुज्जे (वय -21), संगम नामदेव क्षिरसागर (वय-19, दोघे रा. वडगाव मावळ) नितीन त्रिंबक शिंदे (वय -18, रा. गोकुळनगर, कात्रज. मुळ रा. खुठे, जि. लातूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर इतर तीन अल्पवयीन आरोपींच्या नातेवाईकांसमक्ष गुन्ह्याचा तपास करण्यात येत आहे. गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी व तीन मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत. आरोपींना न्यायालयात हजर केले असता अटक केलेल्या आरोपींना न्यायालयाने 28 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदेवाडी (ता. भोर) येथे कात्रजच्या जुन्या बोगद्याजवळ सोमवारी (ता. 18) सौरभ आठवले (वय-25, रा. पंचरत्न सोसायटी, मांगडेवाडी, पुणे) याचा खून झाला होता. राजगड पोलीस सदर घटनेचा तपास करीत असताना एका अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. हा आरोपी मांगडेवाडी येथे त्याच्या आत्याकडे राहत होता. त्याचे मृत सौरभ आठवले याच्या शेजारी राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीबरोबर प्रेमसंबंध होते.
या बाबतची माहिती सौरभ याने मुलीच्या घरच्यांना सांगितली होती. यावरून अल्पवयीन मुलाच्या आत्याने त्याला परत वडगाव मावळ येथील घरी पाठवले. तर मुलीला शाळेत सोडण्याची व परत आणण्याची जबाबदारी मानलेला भाऊ म्हणून सौरभने घेतली. तो रोज तीला शाळेत सोडत असे व परत घरी नेत होता. सौरभमुळे आपल्या प्रेमात अडसर आला. या रागाने अल्पवयीन मुलाने इतरांच्या मदतीने या खुनाची योजना आखली होती.
सोमवारी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सौरभ मुलीला शाळेत आणण्यासाठी गेला असता या अल्पवयीन मुलाने त्यास गाठून तुझ्याशी बोलायचे आहे म्हणून सौरभच्या दुचाकीवर बसून त्यास कात्रज जुन्या बोगद्याजवळ डोंगरातील वाटेवर आणले. त्या ठिकाणी इतर मित्रांनी येऊन सर्वांनी सौरभवर कोयत्याने वार करून खून केला. त्यानुसार पोलिसांनी सदर घटनेचा तपास करीत असताना तांत्रिक माहिती, सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे तपास केला. यावेळी हा गुन्हा तीन अल्पवयीन मुलांनी व तीन इतर मुलांच्या साहाय्याने केला असल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यान, हे आरोपी चतुर्मुख मंदिर गोगलवाडी येथे येणार असल्याचे समजल्यावर पोलिसांनी सापळा लावून सहा आरोपींना ताब्यात घेतले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनुमंत शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, गुन्हे शोध पथकातील अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांनी हि कारवाई केली. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी राजगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली राजगड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड, पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील, वृषाली देसाई, पोलीस अंमलदार सागर गायकवाड, सागर कोंढाळकर, नाना मदने, राहुन कोल्हे, अजित माने, निलेश राणे, अमोल तळपे, अजिज मेस्त्री, अक्षय नलावडे, राहुल भडाळे, मंगेश कुभांर यांनी केलेली आहे.






