पुणे : सरहद संस्था आयोजित अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी ज्येष्ठ नेते शरद पवार असणार आहेत. हे संमेलन २१, २२, २३ फेब्रुवारी २०२५ या काळात दिल्ली येथे होणार आहे. दिल्ली ही देशाची राजकीय राजधानी असल्यामुळे येथे होणारे संमेलन सर्वसमावेशक, व्हावे, या भावनेतून या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी अनुभवी, ज्येष्ठ व साहित्यरसिक व्यक्ती असावी, असा संयोजक समितीने प्रयत्न केला. त्यातून शरद पवार यांनी स्वागताध्यक्ष व्हावे, अशी संस्थेने विनंती केली आणि ती त्यांनी मान्य केली आहे.
दिल्लीमध्ये महाराष्ट्राची अस्मिता ज्या व्यक्तींभोवती केंद्रित असते, त्यातून सर्वात ज्येष्ठ नाव शरद पवार यांचे आहे. त्यांच्या अनुभवांमुळे हे संमेलन अविस्मरणीय होईल आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन मराठी भाषा आणि संस्कृतीचा जागर करणारे ठरेल, असा विश्वास सरहद संस्थेचे संजय नहार, डॉ. शैलेश पगारिया, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे मिलिंद जोशी आणि सुनीता राजे पवार, तसेच संयोजन समितीचे डॉ. सतीश देसाई यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
शरद पवार हे केवळ उत्तम वाचक अथवा साहित्यप्रेमी नसून, महाराष्ट्रातून सांस्कृतिक आणि साहित्यिक चळवळीशी प्रारंभापासून जोडले गेले आहेत. त्यांनी औरंगाबाद (सध्याचे छत्रपती संभाजीनगर) (२००४), नाशिक (२००५), चिपळूण (२०१३) आणि सासवड (२०१४) येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले आहे. १९९० साली त्यांनी स्वागताध्यक्ष व्हावे, असे पुण्यातील संमेलनात समितीने ठरवले होते. मात्र त्या वर्षी ते होऊ शकले नाहीत.
यापूर्वी १९५४ साली दिल्लीला ३७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. त्याचे स्वागताध्यक्ष काकासाहेब गाडगीळ, संमेलनाध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, तर उद्घाटक तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला या संमेलनानंतर बळ मिळाले आणि १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्यानंतर दिल्लीला एकदाही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले नाही. नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे.
या पार्श्वभूमीवर ७० वर्षांनी दिल्लीत होणाऱ्या या संमेलनाचे आयोजन सरहद संस्थेद्वारे केले जात असून, त्याचाच भाग म्हणून एकनाथ शिंदे, राज ठाकरे, नितीन गडकरी आदी नेत्यांना विविध कार्यक्रमांत संस्थेने निमंत्रित केले होते. या पुढील कार्यक्रमांमध्ये आणि व्यवस्थांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि विनोद तावडे यांचे सहकार्य घेतले जाईल.