Pune Prime News : शिवसेना पाठोपाठ राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कोणाचे हे प्रकरणही आता निवडणूक आयोगात पोहोचले असून काका पुतण्याचा आज महत्वाचा दिवस ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नेमका कोणाचा या प्रकरणी निवडणूक आयोगात आज संध्याकाळी चार वाजता सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं तसेच राज्यातील राजकीय वर्तुळाचंही या सुनावणीकडे लक्ष लागून राहिलं आहे. निवडणूक आयोग निकाल देणार की सुनावणी अजून पुढं ढकलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. शरद पवार गटाकडून अभिषेक मनू सिंघवी बाजू मांडत आहेत. तर अजित पवार गटाकडून वकील नीरज कौल आणि मनिंदर सिंग बाजू मांडत आहेत.
सुनावणीला हे बडे नेते राहणार उपस्थित
अजित पवार बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले आहेत. शरद पवार यांनी आपल्या साथीदारांसोबत ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्या राष्ट्रवादी पक्षात मोठी फूट पडली. यानंतर अजित पवार गटान पक्षाचं नाव आणि चिन्हावर दावा ठोकत निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केली होती. अशात आता हा पक्ष नेमका कोणाचा यावर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आज संध्याकाळी सुनावणी होणार आहे. या सुनावणीला स्वत: शरद पवार तसेच त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे दोन मोठे नेते उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील उपस्थित राहणार आहेत.
शरद पवार यांची नियुक्ती घटनेला धरून नाही
राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्षाप्रकरणी मागील काही दिवसात झालेल्या सुनावणीत शरद पवार यांची अध्यक्षपदी झालेली नियुक्ती पक्षाच्या घटनेला धरुन नाही असा युक्तिवाद अजित पवार गटाचे वकील नीरज कौल आणि मनिंदर सिंग यांनी केला होता. दरम्यान, सुनावणी लवकर संपविण्यासाठी घाई करीत असल्याबद्दल आयोगाने अजित पवार गटाला चांगलेच फटकारले होते. शरद पवार गटाकडून पक्षात फूट नाही, पक्ष आमचाच आहे, असा दावा करण्यात आला आहे. पक्षाची घटना, आमदार खासदारांची संख्या, पदाधिकाऱ्यांची संख्या या गोष्टी तपासून निवडणूक आयोगानं निर्णय घेणं अपेक्षित आहे.
शरद पवार गटाकडून 8 ते 9 हजार कागदपत्रं सादर
शरद पवार गटाकडून आठ ते नऊ हजार कागदपत्रे सादर केल्याचं बोललं जात आहे. अजित पवार गटापेक्षाही अधिकचे कागदपत्रं सादर असल्याचा दावाही शरद पवार गटाकडून केला जात आला आहे. शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या लढाईत शपथपत्रं तसेच कागदपत्रांची जोरदार पूर्तता केली आहे. दरम्यान आजच्या सुनावणीत निवडणूक आयोग काय भूमिका घेणार? याकडे राज्यच लक्ष लागले आहे.