पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून प्रचाराने जोर पकडला आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय नेते एकमेंकांवर आगपाखड करतांना दिसत आहेत. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘राज्यात महायुतीचे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. येथील प्रकल्प गुजरातला चालले आहेत. महाराष्ट्र क्रमांक एकवर असताना या सरकारच्या काळात तो सहाव्या क्रमांकावर गेल असून राज्य मागे जात आहे, असा फेक फेक नॅरेटिव्ह शरद पवारांनी पसरवला अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. पिंपरी-चिंचवडमधील प्रचारसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर टीका करत त्यांना “फेक नॅरेटिव्ह फॅक्टरीचे मालक” असे संबोधले आहे.
विरोधकांनी पसरवलेली माहिती फसवी आहे..
पुढे देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले कि, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला स्थलांतरित होत असल्याची खोटी माहिती पसरवून विरोधक महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच त्यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्र हा गुंतवणुकीसाठी अजूनही पहिली पसंती आहे आणि संपूर्ण भारतातील ५२ टक्के विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात येत आहे. महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत बोलताना फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र औद्योगिक दृष्टिकोनातून मजबूत आहे आणि विरोधकांनी पसरवलेली माहिती फसवी आहे. त्यांनी सांगितले की, “आमच्या सरकारने महाराष्ट्राला गुंतवणुकीसाठी एक आदर्श ठिकाण बनवले आहे.” त्यांच्या मते, राज्यातील औद्योगिक स्थान बदलत असल्याची बातमी खोटी असून ती फक्त जनतेची दिशाभूल करण्यासाठी आहे.
फडणवीसांची खासदार सुप्रिया सुळेंवर टीका..
फडणवीसांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरही निशाणा साधला आहे. त्यांनी सुळे यांना “फेक नॅरेटिव्ह फॅक्टरी” ची व्यवस्थापिका असे संबोधले आणि त्यांनी हिंजवडीमधील IT कंपन्या बाहेर गेल्याची चुकीची माहिती दिल्याचा आरोप केला. फडणवीसांनी म्हटले की, राज्यातील औद्योगिक आणि IT क्षेत्र सशक्त आहे आणि कोणतेही आव्हान हे महाविकास आघाडीच्या कार्यकाळात आलेल्या अडचणींचा परिणाम आहे. सुळे यांचे विधान चुकीचे असल्याचे सांगत त्यांनी याला महाराष्ट्राच्या प्रगतीस नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न म्हटले.