पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची भरदिवसा कोथरूडमधील सुतारदरा येथे गोळ्या घालून हत्या झाली. पाच जानेवारीला दुपारी दीड वाजता शरद मोहोळला त्याचाच जवळचा साथीदार मुन्ना पोळेकर याने कायमचं संपवलं. केवळ 20 वर्षाच्या पोराने मोहोळला कोणतीही चाहुलही लागून न देता सोबत राहून एक दिवस अचानक त्याचा काटा काढला. मुन्ना उर्फ साहिल पोळेकर याने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने गोळ्या घालून मोहोळची हत्या केली. मोहोळच्या हत्येमध्ये कोण-कोण सहभागी आहेत याचा तपास पुणे पोलीस करत आहे. कुख्यात गुंड असलेल्या शरद मोहोळ याच्यावरही हत्या, हत्येचा प्रय्तन, खंडणी असे अनेक गुन्हे दाखल होते. मोहोळ टोळीचा सुत्रधार संदीप मोहोळ याची हत्या झाल्यानंतर शरद मोहोळ या टोळीचा मुख्य म्होरक्या झला होता. त्यानंतर त्याने आपल्या सख्या चुलत भावाचा हत्येचा बदला अत्यंत क्रूर पद्धतीने घेतला होता.
शरद मोहोळेने किशोर मारणेला कास संपवलं
मारणे आणि मोहोळ या दोन टोळ्या आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी एकमेकांच्या टोळीतील लोकांना मारत होते. मारणे टोळीतील अनिल मारणे आणि सुधाकर रसाळ यांना संदीप मोहोळच्या टोळीने संपवलं होतं. त्यानंतर याचा बदला म्हणून मारणे टोळीने संदीप मोहोळ याचा पुण्यातील पौड फाटा येथील एका सिग्नलवर गोळ्या झाडून खून केला. संदीपच्या हत्येनंतर शरद मोहोळ याच्याकडे टोळीची सर्व सूत्र आली होती. गणेश मारणे, सचिन पोटे, जमीर शेख आणि संतोष लांडेसह मारणे टोळीने संदीप मोहोळ याची हत्या केली. त्यानंतर भावाच्या मर्डरचा बदला संदीप मोहोळ याने घेतला.
गणेश मारणे हा संदीप मोहोळ याचा खून केल्याने तुरूंगात गेला होता. त्यावेळी मारणे टोळीची सूत्र ही किशोर मारणेकडे आली होती. 11 जानेवारी 2010 ला किशोर मारणे हा मराठी चित्रपट नटरंग पाहण्यासाठी पुणे शहरातील निलायम टॉकीजमध्ये होता. त्यानुसार शरद मोहोळने आपल्या साथीदारांच्या मदतीने सापळा रचला. चित्रपट पाहून बाहेर आल्यावर किशोर मारणे चहा प्यायला शेजारील प्लॅटिनम हॉटेलमध्ये गेला. त्याचा चहा पिऊन झाल्यावर दबा धरून बसलेल्या शरद मोहोळच्या साथीदारांनी त्याला गोळ्या घातल्या. त्यानंतर त्याच्यावर कोयत्याने एक नव्हे, तर तब्बल 40 वार केले होते. या हत्येने संपूर्ण पुणे शहर हादरून गेलं होतं.
शरद मोहोळ आणि त्याचे साथीदार ही हत्या केल्यावर ना. सी. फडके चौकाकडे पळत चालले होते. त्यावेळी रस्त्यात त्यांना एका महिला पोलीस हवालदाराने अडवले. मोहोलसोबत असणाऱ्या अमित पाठक याचा शर्ट रक्ताने माखला होता, हे पाहून महिला पोलीस आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करू लागल्यावर हा फोन फोडत त्यांनी तिथून पळ काढला होता.
दरम्यान, या हत्येच्या खटल्याचा निकाल लागल्यानंतर शरद मोहोळ, अमित पाठक, दीपक भातंमब्रेकर, दत्ता गोळे, योगेश गुरव, हेमंत धाबेकर, मुन्ना ऊर्फ मुर्तझा दावल शेख यांना जन्मठेप झाली होती.