पुणे : पुण्यातील हडपसर परिसरात एक संतापजनक घटना घडली आहे. गरोदर महिलेला जबरदस्तीने दुचाकीवरून घेऊन जात तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी १९ वर्षीय तरुणाला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार २२ ते २४ जानेवारी दरम्यान, हडपसर आणि श्रीगोंदा येथील एका हॉटेलमध्ये घडला आहे.
याबाबत हडपसर येथील २३ वर्षीय महिलेने बुधवारी २४ जानेवारीला हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून यश संतोष केकान (१९, रा. काळेपडळ, हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे दोघे एकाच परिसरात राहतात. फिर्यादी यांचे लग्न झाले असून त्या गरोदर आहेत. आरोपीने फिर्यादी महिलेला स्वत:च्या जीवाचं बरंवाईट करण्याची धमकी देत भेटण्यासाठी बोलावून घेतले. त्यानंतर आरोपी लग्न करण्याच्या उद्देशाने महिलेला जबरदस्तीने श्रीगोंदा येथे घेऊन गेला. फिर्यादी गरोदर असल्याचे माहीत असतानादेखील आरोपीने त्यांच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण अब्दागिरे करत आहेत.