चाकण : बंदिस्त गोठ्यातील मेंढ्यावर बिबट्याने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात ७ मेंढ्या जागीच ठार झाल्या आहेत. खेड तालुक्यातील वडगाव पाटोळे येथील मेंढी पालक शेतकरी बाबाजी सोपान पाटोळे यांच्या या मेंढ्या होत्या. यामध्ये चार नारी सुवर्णा जातीच्या गाभण मादी, तर तीन नर मेंढ्यांचा समावेश होता. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, बिबट्याला पकडण्यासाठी तातडीच्या उपयोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे.
चाकणलगतच्या कडूस, वडगाव पाटोळे व चांडोली या भागात बिबट्याच्या बाबत खेड तालुक्यातील हा भाग हॉटस्पॉट ठरत आहे. वडगाव पाटोळे परिसरातील पाळीव प्राण्यांना बिबट्या लक्ष्य करीत आहे. बिबट्यावरील हल्ल्याच्या प्रकाराने या भागातील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. वडगाव पाटोळे येथील डोंगराच्या बाजूकडील कालव्याच्या कडेला पाटोळे वस्तीवरील बाबाजी पाटोळे यांच्या अंशतः बंदिस्त गोठ्यातील मेंढ्यांवर बिबट्याने शनिवारी हल्ला केला. गोठ्याच्या छतावर चढून बिबट्याने गोठ्यापुढील पत्र्याच्या कंपाउंडमध्ये उतरून मेंढ्यांना लक्ष्य केले. यातील चार गाभण मेंढ्या व तीन नर मेंढ्या जाग्यावरच ठार झाल्या. त्यामुळे पाटोळे कुटुबांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.