पुणे : पुण्यातील हडपसर भागात साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रोहित सुभाष मंडाळकर (वय-१२ रा. महापालिका शाळेसमोर, डीपी रस्ता, हडपसर) असे मृत्यू झालेल्या शाळकरी मुलाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (दि.11) सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास घडली.
पुणे शहर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडत आहे. यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले आहे, तर काही ठिकाणी झाडे देखील पडले आहेत. दरम्यान, रोहित सायंकाळी सातच्या सुमारास हडपसर येथील डीपी रस्त्याने जात होता. यावेळी हँडबॉल स्टेडियमसमोर साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरला होता. यावेळी रोहितला विजेचा धक्का बसला. रोहित जागेवर बेशुद्ध पडला. बेशुद्धवस्थेतील रोहितला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. रोहितच्या मृत्युचे नेमके कारण समजू शकले नसल्याने शवविच्छेदनानंतर मृत्यूचे खरे कारण समजेल असे पोलिसांनी सांगितले. मात्र, साचलेल्या पाण्यात वीजप्रवाह उतरल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. पाण्यात पडल्याने रोहितच्या नाका तोंडात पाणी गेले होते, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी दिली.