-दीपक खिलारे
इंदापूर : येथील अग्रगण्य बँक असलेल्या इंदापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी सत्यशील भिकाजीराव पाटील (वालचंदनगर) यांची सोमवारी (दि.16) बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर बँकेचे संस्थापक व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्यशील पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
नूतन अध्यक्षाच्या निवडीसाठी बँकेच्या सभागृहामध्ये संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये सत्यशील पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या अध्यक्षपदाच्या बिनविरोध निवडीची घोषणा बारामतीचे सहाय्यक निबंधक प्रमोद दुर्गडे यांनी केली.
यावेळी बँकेचे संचालक संदीप गुळवे, विकास देवकर, लालासाो सपकळ, भागवत पिसे, अविनाश कोतमिरे, मच्छिंद्र शेटे-पाटील, गोविंद रणवरे, स्वप्नील सावंत, मनोज मोरे, संजय जगताप, सुभाष बोंगाणे, डॉ.मिलिंद खाडे, संजय रायसोनी, डॉ.अश्विनी ठोंबरे, डॉ.दिपाली खबाले, विजय पांढरे, तानाजी निंबाळकर, प्रशांत भिसे, गिरीष शहा, मुख्य कार्यकारी अधिकारी विजय तावरे उपस्थित होते. सत्यशील पाटील हे सध्या बँकेचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते.
हर्षवर्धन पाटील यांनी सत्कार प्रसंगी बोलताना सांगितले की, बँकेने इंदापूर तालुक्यातील युवक, महिला, उद्योजक यांना सहकार्य केल्याने आज हजारो कुटुंबाना आर्थिक आधार प्राप्त झाला आहे. कर्मयोगी शंकररावजी पाटील, राजेंद्रकुमार घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली आपण मंत्रिमंडळामध्ये असताना स्थापन केलेल्या बँकेस अ वर्ग मिळालेला आहे. गतवर्षी बँकेस सुमारे साडे पाच कोटी रुपये नफा झालेला आहे. त्यामुळे सभासदांना डिव्हीडंट देणे संदर्भातील प्रस्ताव बँकेने रिझर्व्ह बॅंकेकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. बँकेचे कामकाज प्रगतीपथावर असून, बँकेचा सलग 2 वर्ष एनपीए हा शून्य टक्के असल्याचे गौरोदगार हर्षवर्धन पाटील यांनी काढले.
इंदापूर अर्बन बँकेने ठेवीदारांचा मोठा विश्वास प्राप्त केला आहे. गरजू व्यक्तींना त्यांची अडचण असताना बँकेने कर्ज देऊन त्यांची अडचण भागवली आहे. बँकेने कर्जदाराला दिलेले पैसे हे ठेवीदारांचे पैसे आहेत. त्यामुळे कर्ज वसुलीकडे लक्ष देण्याची गरज आहे, अशी सूचना संचालक मंडळास हर्षवर्धन पाटील यांनी केली.
प्रास्ताविक अँड.गिरीश शहा यांनी केले. तर आभार संचालक स्वप्निल सावंत यांनी मानले.
बँकेच्या 4 शाखांना लवकरच परवानगी-हर्षवर्धन पाटील
इंदापूर अर्बन को-ऑप बँक लि. बँकेचा सन 2022-23 व 2023-24 या दोन्हीं आर्थिक वर्षासाठी शून्य टक्के एनपीएच्या सक्षम अशा उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुणे नागरी सहकारी बँक असोसिएशनने 2 स्मृतीचिन्हे व प्रशस्तीपत्रे देऊन बँकेचा नुकताच गौरव केला आहे. बँकेच्या 4 शाखांना लवकरच रिझर्व्ह बँकेकडून परवानगी मिळणार आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी भाषणात स्पष्ट केले.